क्रेन बिघडल्याने विसर्जनाची कसरत
By admin | Published: September 27, 2015 12:28 AM2015-09-27T00:28:01+5:302015-09-27T00:28:30+5:30
कृत्रिम तळे : सार्वजनिकसह घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन
सातारा : पालिकेने गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तळ्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करताना शनिवारी पालिका कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. मूर्ती ठेवण्यासाठी आणलेल्या क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मोठ्या गणपतींचे विसर्जन रखडले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरु होते.
शहरातील मंडईचा राजा, सोमवार पेठेतील आझाद मंडळ, कोटेश्वर मंदिराशेजारील नर्मदेश्वर मंडळ, शेटे चौकातील शंकर-पार्वती या प्रमुख गणेश मंडळांसह १0 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन शनिवार होणार असल्याची नोंद पालिकेकडे होती. शहरातून वाजत-गात व गुलाच्या उधळणीत विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. मोती चौकातून कमानी हौद-शेटे चौक, गुरुवार परज मार्गे गणेश मूर्तींची मिरवणूक पुन्हा मोती चौकात गेली. तिथून प्रतापगंज पेठेतून राधिका टाकीजमार्गे राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये असलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये गणपती विसर्जित करण्यात आल्या.
विसर्जन मार्गामध्ये पोलिसांनी कडा पहारा ठेवला होता. या मार्गावर वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली होती. वाहतूक शाखेची व्हॅन या रस्त्यांवरुन फिरत होती, तसेच वाहनधारकांना वाहने उभी करु नयेत, अशा सूचना केल्या जात होत्या. विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती फार्म, दगडी शाळा, कर्मवीर उद्यान, गोडोली, हुतात्मा उद्यान या ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम तळ्यांभोवती पालिकेच्या वतीने जीवरक्षकांची व्यवस्था केली होती.
विसर्जनावेळी पालिकेची चांगलीच कसरत झाली. गणपती मूर्ती विसर्जन पाहण्यासाठी रस्त्याने येणा-जोणार थांबून तळ्याच्या भिंतीवर जात होते. पालिका कर्मचारी व पोलिसांना वारंवार त्यांना सूचना कराव्या लागल्या. अखेर पालिका कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या बाजूने बांबू रोवून त्यावर पत्रे ठोकावे लागले. (प्रतिनिधी)