खाकी वर्दीने जाणली सैनिकांची व्यथा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:53 AM2020-01-19T00:53:56+5:302020-01-19T00:55:19+5:30
माजी सैनिकांच्या दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या केसेस सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मेळावा नित्यनियमाने सुरू आहे.
दत्ता यादव।
सातारा : देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मेळाव्याची संकल्पना राबविलीय. ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच साताºयात राबविली जात आहे. यामुळे आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी सैनिक स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निमंत्रित करण्यात आले होते. अधीक्षक सातपुते यांनी सातारा जिल्ह्याचे सैन्य दलातील योगदान लक्षात घेऊन ंकुटुंबाप्रती वेगळी संकल्पना जाहीर केली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी फक्त माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. केवळ जाहीर करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी मेळाव्याच्या आयोजनाची सुरुवातही केली.
माजी सैनिकांच्या दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या केसेस सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मेळावा नित्यनियमाने सुरू आहे. जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या मेळाव्याला हजेरी लावत आहेत. अनेकांना जागच्या जागी समाधान मिळाले आहे तर काहींना आपल्या तक्रारीबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्याला स्वत: पोलीस अधीक्षक उपस्थित राहून सैनिकांच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन करत आहेत.
- तत्काळ आदेश..
जिल्हा पोलीस दलाकडून आयोजित केलेल्या मेळाव्यात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय हजेरी लावत आहेत. यातील गेल्या मेळाव्यात शामराव माने (सातारा) यांनी काहीजणांविरोधात आपली तक्रार असल्याचे सांगितले होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
- पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार घेऊन गेल्यानंतर पूर्वी आम्हाला आम्ही माजी सैनिक आहोत, असे सांगावे लागत होते. काही वेळेला आमची ओळख सांगितली नाही तर पोलिसांकडून अपशब्द बाहेर येण्याची शक्यता असते. पोलीस ठाण्यात सैनिकाला आदराची वागणूक मिळेलच, याची शाश्वती नसायची. मात्रा आता पोलीस अधीक्षकांनी सर्वांनाच एकाच छताखाली बोलावून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने समाधान वाटते. सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आलेला हा मेळावा, यापुढेही वर्षांनुवर्षे अखंडितपणे सुरू राहावा, एवढीच अपेक्षा असल्याचे माजी सैनिक सुरेश वाघ यांनी सांगितले.