कोरेगावात उद्या ‘आदर्श माता’ पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:20+5:302021-02-14T04:37:20+5:30
कोरेगाव : येथील जागृती महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘कौसल्या जयवंतराव शिंदे स्मृती आदर्श माता पुरस्कार’ भोसे येथील ...
कोरेगाव : येथील जागृती महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘कौसल्या जयवंतराव शिंदे स्मृती आदर्श माता पुरस्कार’ भोसे येथील संगीता प्रभाकर फंडे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण उद्या, सोमवारी होणार आहे.
मंडळाच्या वतीने हा उपक्रम सुरू असताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या मातोश्री कौसल्या यांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आदर्श माता पुरस्काराला कौशल्या जयवंतराव शिंदे यांचे नाव दिले. त्यांच्या नावे आतापर्यंत पार्वती इंगवले (कुमठे), हरिबाई कदम (आरळे), सुमित्रा क्षीरसागर (कोरेगाव), सावित्रीबाई पाटणकर (तडवळे संमत कोरेगाव) व चंद्रभागा बर्गे (कोरेगाव) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा वंदना शिंदे यांनी सांगितले.
यंदा पुरस्कार जाहीर झालेल्या संगीता फंडे या मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, त्यांचे सासू-सासरे आणि पती पोटापाण्यासाठी भोसे येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांनी अपार कष्ट घेऊन आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. पुरस्कार वितरण उद्या, सोमवारी दुपारी चार वाजता जुना मोटार स्टॅंड, कोरेगाव येथे होणार आहे. कार्यक्रमात खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिंदे व वैशाली शिंदे उपस्थित राहणार आहेत.