ग्रामपंचायत निवडणुकीत चिकनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:42+5:302021-01-13T05:43:42+5:30
सातारा : तालुक्यातील नेले या गावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना घरपोच चिकन पार्सल पोहोचवायला निघालेल्या दोघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
सातारा : तालुक्यातील नेले या गावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना घरपोच चिकन पार्सल पोहोचवायला निघालेल्या दोघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत महसूल विभागाकडून फिर्याद दाखल झाली नव्हती.
नेले ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. मंगळवारी गावामध्ये काही लोक मतदारांना चिकन वाटप करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी सरपंच दत्तात्रय पाटील, सुधाकर केसवडे आणि रमेश पिसाळ यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिकन वाटप करणाऱ्यांची धरपकड केली. दोघे जण रंगेहाथ सापडले, तर बाकीचे पळून गेले. चिकन वाटप सुरू असल्याचे व्हिडिओही पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाफोन केला. मात्र ते तक्रार दाखल करण्यासाठी आले नाही. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी पुन्हा तहसीलदार आशा होळकर यांना फोन करून या कारवाईबाबत माहिती दिली. त्यांनी तक्रार द्यायला अधिकारी पाठवत असल्याची माहिती पोलिसांना दिली. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र साबळे आणि ग्रामसेवक बाळकृष्ण सावंत रात्री पावणेनऊ वाजता पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याने खळबळ उडाली आहे.