शिवजयंतीनिमित्त औषधी रोपांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:25+5:302021-02-20T05:49:25+5:30
मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात शिवजयंतीचे औचित्य साधून ...
मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात शिवजयंतीचे औचित्य साधून औषधी व सुगंधी वनस्पतींच्या रोपांचे वितरण करण्यात आले. शिवजयंतीदिवशीच अनोखा उपक्रम राबवत संयोजकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर येथे शिवजयंती सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, नवी दिल्लीचे अध्यक्ष विजय नवल पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या सहकार्याने औषधी व सुगंधी वनस्पतींची रोपे उपलब्ध केली होती. त्या रोपांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तसेच संस्थेतील विविध शाखांतील मुख्याध्यापकांना वितरण करण्यात आले.
अशोकराव थोरात यांच्या उपस्थितीत व क्रीडाशिक्षक जगन्नाथ कराळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक शेखर शिर्के, पर्यवेक्षक अनिल शिर्के, कॉलेज विभागप्रमुख शीला पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले ,शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. आपण सर्वांनी महाराजांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे.
प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेखर शिर्के यांनी केले, सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले; तर अनिल शिर्के यांनी आभार मानले.