तासगावात कालबाह्य बियाणांचे वाटप
By admin | Published: June 25, 2015 01:11 AM2015-06-25T01:11:00+5:302015-06-25T01:11:17+5:30
शेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागाचा प्रताप, मोफतच्या तणनाशकांची बेकायदा विक्री; कारवाईची मागणी
दत्ता पाटील / तासगाव
तासगाव तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडूनच शेतकऱ्यांना कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे अनुदानावर वाटप होत आहे. मागीलवर्षी आलेल्या बियाणांची विक्री न झाल्यामुळे गोदामामध्ये पडून असलेल्या, मुदत संपलेल्या बियाणांची विक्री होत आहे. एवढेच नाही, तर गेल्यावर्षी मोफत वाटलेल्या तणनाशकाचे यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदाही खुलेआमपणे कृषी विभागात सुरू आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होत आहे.
मान्सून पावसाचे आगमन झाल्यामुळे तासगाव तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून गेल्यावर्षी अनुदानावर मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते. महाबीज कंपनीच्या ‘कुबेर’ नावाच्या चार किलोच्या बियाणांच्या बॅगेची २२० रुपयांप्रमाणे गेल्यावर्षी शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली होती. या बॅगेची किंमत आठशे रुपये आहे. या बियाणांच्या बॅगेसोबत ‘अट्रानेक्स’ या नावाचे अर्धा किलोचे तणनाशक मोफत देण्यात आले होते. मागील खरीप हंगामाप्रमाणेच या हंगामात अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. कृषी विभागाच्या यंत्रणेनेदेखील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप सुरू केले आहे. मात्र हे बियाणे गेल्यावर्षीचेच आहे. हे बियाणे १८ एप्रिल २०१५ रोजीच कालबाह्य झाले आहे. तसेच गेल्यावर्षी मोफत वाटप करण्यात आलेले आणि शिल्लक राहिलेले तणनाशक यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे विकले जात आहे. अशापध्दतीने मुदत संपलेल्या मका बियाणांचा आणि मोफत असूनदेखील तणनाशकाची पैसे घेऊन विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागात राजरोसपणे सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणांबाबतीत जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठीही कृषी विभागाने जनजागृती करण्याची आवश्यकता असताना, या विभागाकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र तासगावात पहायला मिळत आहे.