जिल्ह्यात २२५ अर्ज अवैध

By Admin | Published: November 2, 2016 11:25 PM2016-11-02T23:25:18+5:302016-11-02T23:25:18+5:30

नगरपालिका निवडणूक : आता धुमशान अर्ज माघारीचे

In the district, 225 applications are invalid | जिल्ह्यात २२५ अर्ज अवैध

जिल्ह्यात २२५ अर्ज अवैध

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून, यात संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास २२५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. सातारा पालिकेतील दोन उमेदवारांच्या अर्जावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळण्यात आले असून, साताऱ्यात फक्त एक अर्ज अवैध ठरला. दरम्यान, छाननीनंतर बहुतांश उमेदवारांची धाकधूक संपली असून, आता अर्ज माघारीचे धुमशान सुरू होणार आहे.
कऱ्हाड पालिकेत २१८ पैकी सहा अर्ज अवैध ठरले. मात्र, नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या चौदाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. फलटण नगरपालिकेच्या छाननीत ३२ नगरसेवक उमेदवारांचे, तर सहा नगराध्यक्षपदाचे अर्ज अवैध ठरले.
रहिमतपूर नगरपालिकेसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ अर्ज वैध, तर नगरसेवक पदासाठी ५१ अर्ज वैध ठरले. वाईत १२४ पैकी दोन अर्ज अवैध ठरले आहेत.महाबळेश्वर पालिकेत दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. पाचगणीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय शंकर वन्ने यांचा अर्ज अवैध ठरला. नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी १३३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने ८१ उमेदवारांचे १२८ अर्ज उरले आहेत.
म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर २१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात ७७ उमेदवारांचे ९१ अर्ज राहिले आहेत. दहिवडी नगरपंचायतीत १७ जागांसाठी ९२ उमेदवारांनी ११५ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ उमेदवारांचे ३३ अर्ज अपात्र ठरल्याने ८२ अर्ज शिल्लक असून, ७३ उमेदवार अद्यापही रिंगणात आहेत. वडूज नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण २०८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १५४ अर्ज वैध तर ५४ अर्ज अवैध ठरले आहेत.
कोरेगाव नगरपंचायतीत १७ जागांसाठी १०२ अर्जांपैकी ११ उमेदवारांचे १७ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आले आहेत. छाननीनंतर ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
खंडाळा नगरपंचायतीत १०४ पैकी ४५ अर्ज पक्षाच्या वतीने भरलेले ए. बी. फॉर्म नसल्याने बाद ठरविण्यात आले. ज्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म प्रथम क्रमांकाने दिले गेले होते, त्यांचेच अर्ज वैध धरण्यात आले.
मेढ्यात तिढा वाढला
मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रेश्मा मुकणे या महिलेचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाला होता. मात्र, हाही एकमेव अर्ज छाननीत नामंजूर झाल्याने सध्या तरी अनुसूचित जाती जमातीसाठी नगराध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, १७ प्रभागांसाठी आलेल्या ६८ उमेदवारी अर्जांपैकी सात अर्ज अवैध ठरले आहेत.

 

Web Title: In the district, 225 applications are invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.