जिल्हा बँकेची गाडी अध्यक्षांच्या प्रतीक्षेत !
By admin | Published: May 28, 2015 09:44 PM2015-05-28T21:44:57+5:302015-05-29T00:06:47+5:30
वाहन वापराविना : बँकेचे अध्यक्ष वापरतात खासगी वाहन
सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दिमतीला असलेली फॉर्च्युनर गाडी निवडणूक पार पडल्यापासून एका जागेवरच उभी आहे. लाखो रुपये खर्च करून घेतलेली ही फॉर्च्युनर गाडी जास्त दिवस बंद अवस्थेत असेल तर या गाडीला अनेक ‘आजार’ जडतात म्हणे.. सध्या ही गाडी अध्यक्षांच्या सवारीच्या प्रतिक्षेत आहे.शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली. बँकेचा कारभार पाहता यावा व तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत संपर्क साधता यावा, यासाठी बँकेच्या अध्यक्षांच्या दिमतीला फॉर्च्युनर गाडी देण्यात आली आहे. मात्र ही गाडी गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या आवारात अध्यक्षांच्या प्रतिक्षेत आहे.
बँकेचे नूान अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे स्वत:ची गाडी असल्यामुळे ते त्यांच्याच गाडीतून रोज प्रवास करतात. सध्या त्यांचे मतदार संघामध्ये दौरे सुरू असल्यामुळे ते स्वत:चीच गाडी वापरत असल्याचे बोलले जात आहे.
बँकेच्या कामासंदर्भात जरी अध्यक्षांना बाहेर प्रवास करावा लागला तरी ते त्यांच्या गाडीतूनच प्रवास करत आहेत. त्यामुळे बँकेच्या गाडीचा वापर कमी झाला आहे. साहजीकच या गाडीवरील चालकालाही काही काम उरले नाही. त्यामुळे जितक्या दिवस फॉर्च्युनर जागेवर उभी राहिल. तितक्या दिवसात या गाडीची बॅटरी पुर्णपणे उतरते. त्यामुळे रोज या गाडीला थोडा तरी प्रवास हवाच असतो. असे व्हेईकलमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तब्बल २६ लाखांपासून पुढे या फॉर्च्युनर गाडीची किंमत असून स्पोर्ट युटीलिटीमध्ये या गाडीचा समावेश आहे. ही इतकी महागडी गाडी जर जागेवरच उभी असेल तर बॅटरी निकामी होण्याची दाट शक्यता असते.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या इतर कामांसाठी या वाहनाचा वापर होऊ शकतो. अध्यक्ष वापरत नसले तरी इतर जण तिचा वडाप सारखा वापर करु नयेत, म्हणजे मिळवली, अशी खासगीत चर्चा आहे. (प्रतिनिधी)
गाडीचा वापर काय होणार?
बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्यकालात या रुबाबदार गाडीचा वापर झाला. या गाडीने मुंबई, पुणे, कोल्हापूर असे दौरेही केले; परंतु आता मात्र ती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंग लावलेली पाहायला मिळते. गाडीचा चालक ही गाडी रोज स्वच्छ करुन ठेवतो. गाडीचा कधीही वापर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तयारी केली जाते. मात्र, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तिचा वापरच करत नाही. अध्यक्षांसाठी असलेले वाहन त्यांनी वापरलेच नाही, तर ते शोपिस ठरु शकते. अथवा इतर संचालक तिचा वापर करु शकतात. साहजिकच या वाहनाचा वापर ‘इतर’ जणच करु शकतात. त्यामुळे तिचा रुबाब कमी होणार काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
माझी स्वत:ची गाडी असल्याने मी ही गाडी यापूर्वीही वापरत होतो. बँकेच्या कामानिमित्त मुंबईला जाणे अद्याप झालेले नाही, त्यामुळे मी माझीच गाडी वापरतो. इथून पुढच्या काळातही मी माझीच गाडी वापरणार.
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक