जिल्हा बँकेत तोडातोडीची भाषा!

By admin | Published: March 27, 2016 10:35 PM2016-03-27T22:35:19+5:302016-03-28T00:20:01+5:30

गोरे-शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने : पीक कर्ज न दिल्यास अधिकाऱ्यांचे पाय मोडू

District bank breakdown! | जिल्हा बँकेत तोडातोडीची भाषा!

जिल्हा बँकेत तोडातोडीची भाषा!

Next

सातारा : ‘पीकपाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नये, असा ‘सुलतानी’ ठराव फलटणकरांच्या सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेनंतर घेतला गेला आहे. मात्र, शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अडवणूक केल्यास त्यांचे पाय मोडू,’ असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, पूर्वीप्रमाणे कर्ज देण्यास बँकेने निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील बँकांच्या शाखांसमोर आंदोलने केली जातील, असा इशाराही आ. गोरे यांनी यावेळी दिला.
सातारा येथे सर्किट हाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘रामराजेंच्या इशाऱ्यावरून बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक काम करत आहेत. हा ठराव करताना बँकेचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव पाटील हे सूचक आहेत, तर आ. प्रभाकर घार्गे हे अनुमोदक आहेत. या ठरावाला अनुमोदन देणारे आ. घार्गे हे गोरेंच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, असा कांगावा करत आहेत. आ. घार्गे शेतकऱ्यांना भडकाविण्याचे काम करत आहेत.

माझ्या आंदोलनाचा आणि या ठरावाचा काही संबंध नाही. शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण हे फलटणकरांचे आहे. रामराजेच शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत.’
‘जिल्हा बँकेच्या कार्यकारिणी कमिटीत निर्णय घेणारे संचालक व होयबा संचालक बँक ही खासगी प्रॉपर्टी समजून काम करत आहेत. शासनाने अथवा नाबार्ड बँकेने पीकपाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नये, असा कोणताही आदेश काढला नसताना सत्ताधारी संचालकांनी शेतकरीविरोधी धोरण घेऊन गोरेला बदनाम करण्याचे षडयंत्र अवलंबले आहे. नाबार्ड बँकेचे २०१४ च्या पत्रातील गाईडलाईननुसार ठराव करून शेतकऱ्यांना पीक कर्जाला बँकेकडून अडवणूक केली जात आहे. त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात माण तालुक्यात सुरू आहे. मी बँकेच्या विरोधात आंदोलन केले म्हणून शेतकऱ्यांमध्ये माझ्याविषयी कटुता निर्माण करण्याचे
काम संचालक करत आहेत.
जिल्हा बँकेत नोकरभरती करण्यापेक्षा हंगामी कामगारांना बँकेच्या सेवेत कायम करावे,’ अशीही मागणी आमदार गोरे यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)

सुनील मानेंना चहा अध्यक्षांच्या परवानगीने !
बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता आहे काय?, त्यांची बँकेत काय पत आहे, ते सर्वांनाच ज्ञात आहे. शिपायाचा पगार किती आहे, हे विचारण्याची पात्रता नसणाऱ्या सुनील माने यांनी आपल्यावर बोलू नये. त्यांना बँकेत चहा घ्यायचा म्हटले तर अध्यक्षांना विचारून घ्यायला लागतो, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला. जावळीचे वसंतराव मानकुमरे कोण? ते लाचार असून, त्यांनी माणच्या माणसाच्या नादी लागू नये, यातच त्यांचं भलं आहे, असा सबुरीचा सल्लाही आ. गोरे यांनी यावेळी दिला.

‘नाबार्डच्या परवानगीसाठी गोरेंनी पुढाकार घ्यावा : अध्यक्षांचा टोला
जिल्हा बँक नाबार्डच्या निर्णयानुसार निर्णय घेत असते. नाबार्डने २०१५ रोजी नवे पत्रक काढून पीकपाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नये, असे म्हटले आहे. तेव्हा कर्जाला नाबार्डकडून परवानगी काढण्यासाठी आ. गोरे यांनी पुढाकार घेऊन जिल्'ातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. रामराजे किंवा मी, राजे असलो तरी आमच्यासाठी विधीमंडळात वेगळा दरवाजा नाही, हे त्यांनी समजून घ्यावे,’ अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.


बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘पीक पाहणी न करता कर्ज दिले जाते, अशी तक्रार आमदार गोरे यांनीच केली होती. त्यांच्या मागणीनुसार हिंगणी येथील बँकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याची वेतनवाढही रोखली आहे. डेलीव्हेजेसवर काम करणाऱ्या कामगारांना जिल्हा बँकेच्या सेवेत घेणे कायद्यामध्ये तरतूद नाही. उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिलेला आहे. बँकेमध्ये सरकारची परवानगी घेऊन लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतरच गुणवत्तेवर नोकरभरती केली जाते. थेट नेमणूक केली जात नाही.’


सध्या बँकेचे सभासद भागभांडवल १४६ कोटींवर जाऊन त्यात वाढ झाली आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी कॅश के्रडिट योजना काढली असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बिनबुडाचे आरोप करून गोरे बँकेची बदनामी करत आहेत. त्यांचे आरोप वस्तुनिष्ठ नाहीत. संस्थेविरोधी वक्तव्य करून विश्वासार्हता कमी करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे,’ असा टोला त्यांनी आमदार गोरे यांना लगावला.

Web Title: District bank breakdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.