शेतीमाल गोदामासाठी जिल्हा बँकेची मदत

By admin | Published: August 28, 2016 12:04 AM2016-08-28T00:04:28+5:302016-08-28T00:04:28+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत घोषणा

District Bank's help for agricultural godown | शेतीमाल गोदामासाठी जिल्हा बँकेची मदत

शेतीमाल गोदामासाठी जिल्हा बँकेची मदत

Next

सातारा : ‘शेतीमालाची शास्त्रीय साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी गोदामांचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाची ग्रामीण गोदाम योजना सुरू आहे. याकरिता जिल्हा बँकेतर्फे कर्जपुरवठा केला जात आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान तसेच बँकेच्या व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. विकास सेवा सोसायट्या, मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने आदींनी या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६६ वी वार्षिक सभा शनिवारी पार पडली. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे इतर संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व अधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कामकाज, भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे.
‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’समध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून या बँकेची नोंद झाली
आहे.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्कर्षासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याच्या परिपूर्तीसाठी संचालक मंडळ योग्य निर्णय घेत आहे. जिल्हा बँक कृषी कर्जावर भर देत आहे. आता वैयक्तिक कर्जावर भर देणे आवश्यक बनले आहे. स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांच्या भल्याचे निर्णय आम्ही घेत आहोत.’
दरम्यान, यावेळी सोसायटी सक्षमीकरणाचा ठराव करण्यात आला. सभासद पातळीवर कर्ज वसुलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोसायट्यांचा गौरव करण्यात आला. खोडत (ता. सातारा), पोतले (कऱ्हाड), अलगुडेवाडी (ता. फलटण), नहरवाडी (कोरेगाव), भुरकवडी (ता. खटाव), वाठार बुद्रुक (ता. खंडाळा), सोनगिरवाडी (ता. वाई), दाडोली (ता. पाटण), इंदवली (ता. जावळी), पांगरी (ता. माण), मेतगुताड (ता. महाबळेश्वर) या सोसायट्यांचा यात समावेश आहे. जनाबाई जुनगरे, यशोदा हरी पवार (पाल), साधना पोपट फडतरे (वाकेश्वर), मंगल शहाजी आटपाडकर (वरकुटे), कमल हणमंत चतूर (धुमाळवाडी) यांना अपघात विम्याचा लाभ देण्यात आला.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. सभासदांचे सुनील माने यांनी स्वागत केले. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी अहवाल वाचन केले. राजेंद्र राजपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सभासदांची लक्षणीय उपस्थिती
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेला सभासदांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरले होते. तर सभागृहाबाहेरही सभासद उभे राहून भाषणे ऐकत होते. या लक्षणीय उपस्थितीचा उल्लेख रामराजेंनी आपल्या भाषणात केला.

 

Web Title: District Bank's help for agricultural godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.