जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६५ कोटींचा नफा : शिवेंद्रसिंहराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:50+5:302021-05-08T04:41:50+5:30
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२१ या वर्षात १०७ कोटी ३६ लाख इतका करोत्तर नफा झाला ...
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२१ या वर्षात १०७ कोटी ३६ लाख इतका करोत्तर नफा झाला असून, निव्वळ नफा ६५ कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, शिवरुपराजे नाईक-निंबाळकर, अनिल देसाई, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, बँकेने या वर्षामध्ये आगाऊ आयकर रु. २३ कोटी ६३ लाख भरणा केला आहे, शासन व्याज येणे रु. १४ कोटी ५९ लाख जमा केले आहे व सोसायटी सक्षमीकरण व्याज रिबेट रु. ३ कोटी ६३ लाख इतका खर्च होऊन करोत्तर नफा रु. १०७ कोटी ३६ लाख झाला आहे. बँकेने शेतकरी सभासदांसाठी विविध तरतुदी व योजना केल्या आहेत. १ ते ९ लाखापर्यंतच्या पीककर्जावर दोन टक्के व्याज परतावा देण्यासाठी ६ कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. नियमित कर्ज परतफेड कर्जदार सभासदांच्या अल्पमुदत कर्जावर दहा वर्षांपासून बँक परतावा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी १ कोटी १ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे कालावधीत शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने प्राप्त होत असून, अशा प्रकारचे कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.