जिल्हाबंदी होण्यापूर्वीच ऊसतोड मजूर घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:35+5:302021-04-29T04:30:35+5:30
कऱ्हाड तालुका म्हणजे ऊस शेतीचा पट्टा. उसामुळे येथे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे; मात्र आजही याठिकाणी ऊस तोडणी मजूर ...
कऱ्हाड तालुका म्हणजे ऊस शेतीचा पट्टा. उसामुळे येथे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे; मात्र आजही याठिकाणी ऊस तोडणी मजूर बीड, उस्मानाबाद, आंबेजोगाई, लातूर जिल्ह्यातून येतात. आपल्या कुटुंबासह व घरी दावणीला असणाऱ्या जनावरांसह कारखानास्थळी हे मजूर येतात. कारखाना व्यवस्थापन त्यांच्या निवाऱ्याची व दिवाबत्तीची सोय करते. साधारण चार ते पाच महिने मजूर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करून गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाना व्यवस्थापन ऊस तोडणी मजुरांचा करार करून आर्थिक उचल देऊन त्यांना ऊस तोडणीसाठी बोलावत असतात. गळीत हंगाम सुरू असताना मजूर घेतलेली उचल फेडून चार पैसे गाठीला कसे राहतील, या विवंचनेत असतात. जास्तीत जास्त ऊस तोडणी व वाहतूक करण्याचा कसोशीने ते प्रयत्न करतात. उसाची उपलब्धता विपूल असणाऱ्या ठिकाणी गळीत हंगाम उशिरापर्यंत सुरू राहतो. तर काही ठिकाणी हंगाम कमी कालावधीचा असतो. अशावेळी अनेक ऊसतोडणी मजूर एका कारखान्याचे गळीत लवकर संपल्यास दुसऱ्या ठिकाणी कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होताना दिसतात. गळीत हंगाम संपल्यानंतर मात्र या मजुरांच्या आनंदाला पारावर राहत नाही. बैलगाडी तसेच ट्रॅक्टरची सजावट करून गुलालाची उधळण करीत मजूर आनंद व्यक्त करतात.
सध्याही तालुक्यातील बहुतांश कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून मजूर गावी परतले आहेत. जिल्हाबंदी होण्यापूर्वी हंगाम संपल्यामुळे या मजुरांना आपल्या गावी जाण्यात कोणतेही अडथळे आले नाहीत.