जि.प.पदाधिकारी निवडी २१ ला
By admin | Published: March 6, 2017 11:43 PM2017-03-06T23:43:32+5:302017-03-06T23:43:32+5:30
कार्यक्रम जाहीर : अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर
सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात २१ मार्चला दुपारी अडीच वाजता या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांची मुदत २० मार्चला संपत असल्याने नूतन पदाधिकाऱ्यांची निवड दि. २१ मार्चला करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब केले.
दि. २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवी शिवदास यांच्याकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करायचा आहे. दुपारी २ ते २.१० या वेळेत कोरम तपासणी होईल. कागदपत्रांची तपासणी करून दुपारी २.२१ ते २.३० या वेळेत अर्ज माघारी घेता येतील. दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनंतर आवश्यक वाटल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी मतदान घेण्यात येईल.
अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. या शर्यतीत वसंतराव मानकुमरे, मनोज पवार, सुरेंद्र गुदगे, मानसिंगराव जगदाळे यांचीही नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या निर्णयाकडे या सर्वांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती निवडी दि. १४ मार्चला संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहेत. सभापती व उपसभापती निवडीसाठीही अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी)