झाडानी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्त वळवींसह तिघांना नोटीस
By दीपक शिंदे | Published: May 31, 2024 08:07 PM2024-05-31T20:07:40+5:302024-05-31T20:07:52+5:30
११ जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश : उपस्थित न राहिल्यास जमीन सरकारजमा
सातारा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांना नोटीस काढण्यात आली आहे. यानुसार त्यांना सुनावणीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अनुपस्थित राहिल्यास जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, झाडाणी येथील ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी करून अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याची तक्रार सुशांत मोरे यांनी केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी निवेदन देऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून वाईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
आता याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांना नोटीस काढली असून याप्रकरणी ११ जून रोजी सकाळी ११ वाजता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सातारा जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यांत धारण करत असलेल्या जमिनीचे सातबारा उतारा, खरेदीदस्त, फेरफार आणि इतर आपल्याकडील कागदपत्रांसह लेखी म्हणणे घेऊन उपस्थित रहावे.
या सुनावणीस गैरहजर राहिल्यास किंवा आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगायचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार जमीन धारणेची कमाल मर्यादेपेक्षा जास्त धारण करत असलेली जमीन सरकार जमा करण्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.