माणुसकी विसरणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:11+5:302021-05-13T04:40:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा चेहरा नातेवाईकांना दाखविण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार लोकमतने उघड केला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा चेहरा नातेवाईकांना दाखविण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार लोकमतने उघड केला होता. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रशासनाच्या वतीने चांगल्या सुविधा पुरविल्या जातात. रुग्णांची काळजीही घेतली जाते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नातेवाईकांना लुबाडण्याचा प्रकार सुरु होता. याबाबत लोकमतने दि. ११ मे रोजी 'मृताचा चेहरा दाखविण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी' या आशयाचे वृत्त दिले होते. जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर नातेवाईकांना चेहरा दाखविला जातो. त्यानंतर हे मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेले जातात. त्याठिकाणी नातेवाईकांकडून पैसे मागण्याचा प्रकार होतो. काहींकडून २०० तर काहींना ५०० रुपयांची मागणी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या; मात्र, अगतिकतेमुळे लोक बोलत नव्हते. अखेर लोकमतने याची दखल घेऊन सर्वसामान्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला.
या वृत्ताची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. तसेच संबंधित प्रकाराच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने हा सर्व प्रकार हाताळत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कोट
लोकमतच्या या वृत्ताची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून असा प्रकार सुरु असल्याबाबत माहिती नव्हते; मात्र यापुढे असे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हा प्रकार पूर्णत: चुकीचा असून प्रशासकीय पातळीवर आम्ही कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.
रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा