वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:21+5:302021-03-04T05:15:21+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वरिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर ...
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वरिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर तातडीने महाविद्यालये सुरू करण्याचा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून ‘लोकमत’ने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील महाविद्यालये बंद ठेवल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा २२ मार्चपासून सुरू होत आहेत. अद्याप अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाहीत. महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ असे विभाग असून, ५ ते १२ वी वर्ग सुरू ठेवल्यामुळे कनिष्ठ विभाग महाविद्यालयास सुरू ठेवावा लागतो व वरिष्ठ विभाग बंद ठेवावा लागतो. ही विसंगती विद्यार्थी व पालकांमध्ये आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहेत. त्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर असणे आवश्यक आहे. कारण कर्मचारी वर्ग अपुरा आहे. परीक्षा फॉर्म व स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू आहे त्यास कालमर्यादा शासन व विद्यापीठाने ठरवून दिल्यामुळे ते सुरू ठेवणे आवश्यक आहे आदी बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
आरोग्य व सुरक्षिततेबाबत निर्धारित केलेले आदर्श कार्यप्रणाली (रडढ) चे पालन केले जाईल. हे नियम व अटींनिशी महाविद्यालये सुरू करण्याबाबत पुनर्विचार व्हावा, अशी विनंती प्राचार्यांनी यावेळी केली होती.
सातारा जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा सुधारित आदेश सायंकाळी काढला. विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन याप्रश्नी वाचा फोडल्याबद्दल प्राचार्य संघटनेने ‘लोकमत’चे आभार मानले. विद्यार्थी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.
नवा आदेश काय सांगतो?
- वरिष्ठ महाविद्यालये आजपासून सुरू
- इयत्ता नववी व त्याखालील सर्व वर्ग, इन्स्टिट्यूट बंद
- १० वी व त्यावरील सर्व वर्ग, महाविद्यालये, शिक्षणसंस्था सुरू राहणार
- सर्व मार्केट व दुकाने रात्री ९ ते सकाळी ९ बंद
- रात्रीची संचारबंदी कायम
- लग्नसमारंभांना ५० लोकांना (भटजी, वाजंत्री, वाढपीसह) परवानगी