जिल्हाधिकाऱ्यांनी तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांची माहिती द्यावी : सुरेंद्र गुदगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:46+5:302021-05-15T04:37:46+5:30
मायणी : येत्या ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही येणारी तिसरी लाट किती मोठी आहे? ...
मायणी : येत्या ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही येणारी तिसरी लाट किती मोठी आहे? व यावर जिल्हा प्रशासनाने कोणती तयारी केली आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला द्यावी,’ असे मागणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली आहे.
गुदगे म्हणाले, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेविरुद्ध लढताना कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे कडक लाॅकडाऊन पाळावा लागला. त्यानंतर दुसरी लाट आली. या दोन्ही लाटेंतील वेळ प्रशासनाने वाया घालवला. त्यामुळे रुग्णांना बेड मिळेनात, अशी अवस्था निर्माण झाली. तरीही या काळात ७० टक्के लोक घरातच उपचार घेत आहेत. असे असताना केवळ ३० टक्के लोकांवर उपचार करताना प्रशासनाची दमछाक उडाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वयोवृद्ध टार्गेट झाले होते, तर दुसऱ्या लाटेत सध्या चाळिशीच्या दरम्यानचे लोक टार्गेट होत आहेत.
जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २५ ते ४० वयोगटांतील तरुण पिढी टार्गेट झाली तर समाजाची फार मोठी हानी होईल. तरुणांची हानी झालीतर जनतेच्या संतापाला हॉस्पिटल व प्रशासन असे दोघांनाही सामोरे जावे लागेल किंवा तिसऱ्या लाटेत लहान मुलांना किंवा बालकांना टार्गेट केले तर पुण्याच्या धर्तीवर चिल्ड्रन मदर कोरोना सेंटरचे नियोजन केले का? तिसरीला थोपवण्यासाठी किंवा तिची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाचे उपाय योजनांची माहिती द्यावी.’