कलेढोण, चितळी येथे जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:41+5:302021-06-11T04:26:41+5:30
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील आयसोलेशन सेंटर व कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाला जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी गुरुवारी भेट ...
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील आयसोलेशन सेंटर व कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाला जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी गुरुवारी भेट देऊन या ठिकाणची कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था, संख्या, लसीकरण व चाचणीबाबतचा आढावा घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक कोरोना कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याबाबत अशा सूचना दिल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी खटाव तालुक्याला भेट देणार, अशी चर्चा सुरू होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांनाही उत्सुकता लागून राहिली होती. अखेर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी खटाव तालुक्याला भेट दिली.
चितळी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये सुरू असलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. गृह अलगीकरणमध्ये असणाऱ्या रुग्णांना घरामध्ये न ठेवता, विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याबाबतच्या सूचना केल्या, तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये रिक्त असलेल्या जागेबाबतही माहिती घेतली.
कलेढोण येथील दिवंगत बाबासाहेब भोसले ग्रामीण कुटीर रुग्णालयात भेट देऊन याठिकाणी असलेल्या इमारतीची पाहणी केली. तसेच झालेल्या दुरवस्थेची माहिती घेतली. वर्षभर याठिकाणी किती प्रसुती झाल्या, लसीकरण कशा पद्धतीने सुरू आहे, चाचणी किती होतात, याबाबतची सखोल माहिती घेतली.
कलेढोणच्या सरपंच प्रीती शेटे यांनी कुटीर रुग्णालयाकडून लसीकरणाबाबत व आलेल्या लसीबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने याठिकाणी आलेल्या लसी शिल्लक राहत असून, ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुटीर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांशी व स्थानिक कोरोना कमिटीशी समन्वय ठेवण्याबाबत सूचना दिल्या.
१० कलेढोण
कलेढोण (ता. खटाव) येथील कुटीर रुग्णालयाची गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. (छाया : संदीप कुंभार)