जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:49 AM2019-12-05T10:49:02+5:302019-12-05T10:51:56+5:30
सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर लिहिलेला आहे, असे सांगण्यात आले.
सातारा : येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर लिहिलेला आहे, असे सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याजवळच जिल्हा कारागृह आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृहातील सर्कल नंबर २ च्या पाठीमागे असलेल्या कैद्याच्या अंघोळी शेडच्या पत्र्यावर कोणीतरी काहीतरी टाकल्याचा आवाज आला. त्यामुळे तेथील पोलीस कशाचा आवाज आला आहे? ते पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्याठिकाणी खाकी रंगाच्या कागदात काहीतरी गुंडाळल्याचे दिसून आले. त्यानंतर आत पाहिले असता प्लास्टिकच्या कागदात चायनीज चिकन राईस, एक पांढऱ्या रंगाचा धारदार कटर आणि एक चिठ्ठी मिळून आली.
कारागृहात आढळलेल्या या चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे, असा मजकूर होता. तसेच या मजकुराच्या डाव्या बाजूस वर्तुळात टीजी ही अक्षरे होती. तर कारागृहात हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांनी कारागृह अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार दौलत खिलारे यांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.