जिल्ह्याचे प्रवेशद्वार पुन्हा ‘लॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:43+5:302021-04-24T04:40:43+5:30
शिरवळ : सातारा जिल्ह्यात येताय? सावधान ! विनापरवानगी येण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई होणार असून, सारोळा पुलावर पुन्हा कोरोनाला ...
शिरवळ : सातारा जिल्ह्यात येताय? सावधान ! विनापरवानगी येण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई होणार असून, सारोळा पुलावर पुन्हा कोरोनाला थोपविण्यासाठी शिरवळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये चेकनाका उभारला आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याकरिता राज्य शासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात येणार असाल तर त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनी व वाहनांनी प्रवेश करू नये, याकरिता सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या व पुणे-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुरुवारी (दि. २२) रात्री आठच्या सुमारास चेकनाका उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस दलातील एक अधिकारी, सातारा जिल्हा वाहतूक पोलीस दलाचे दहा कर्मचारी, पाच होमगार्ड व शिरवळ पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा जिल्हाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांना अनेक विचित्र अनुभव येत असून, विनापरवानगी व विनापास येणाऱ्या नागरिकांना परत जाण्याकरिता सांगितले असता नागरिकांकडून दिली जाणारी कारणे ऐकून पोलीसही अचंबित होत आहेत. मात्र जिल्हाबंदीचा आदेश असल्याने कारणे ऐकून पोलीसही हतबल झालेले दिसून येत आहेत. प्रसंगी पोलिसांना विनापरवानगी आलेल्या नागरिकांना परत जाण्यास सांगितले असता नागरिकही महिलांना पुढे करीत असल्याने संबंधित पोलिसांबरोबर शाब्दिक वादावादी घालत असल्याने पोलिसांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या सारोळा पुलावर गेल्या वर्षीप्रमाणे करण्यात आलेल्या लाॅकडाऊन व सातारा जिल्हाबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात येत असून, विनाकारण व विनापास नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
----------
(चौकट)
सारोळा पुलावरून वाहने परत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आल्याने व त्यामध्ये जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याने आशियाई महामार्ग ४७ वर अत्यावश्यक वाहने व मालवाहतूक वाहने सोडता खासगी वाहनांची वर्दळ अल्प प्रमाणात दिसून आली. त्यामुळे जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहनांमधून प्रवास करण्याचा मोह टाळला असल्याने खासगी वाहने कमी प्रमाणात निदर्शनास आली. सारोळा पुलावरून पोलिसांनी वैध कारणांशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या ५० ते १०० वाहनांना पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून परत पुण्याच्या दिशेने परतविल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. प्रसंगी पोलिसांबरोबर शाब्दिक वादावादीचा प्रसंगही बहुतांश वेळा आला.
कोट-
शासनाच्या निर्देशानुसार व सातारा जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या अठरा ठिकाणी व मुख्य ठिकाण असणाऱ्या कऱ्हाडजवळील मालखेड तसेच पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सारोळा पुलावर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्याकामी चेकनाका उभारण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठी प्रशासनाकडून ई-पास सेवेची कार्यप्रणाली सातारा जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली असून, त्याकरिता १० काॅम्प्युटर व तीन टप्प्यांत कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ई-पासकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज दाखल केल्यानंतर २४ तासांमध्ये ई-पास मिळण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे.
- अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, सातारा
----------
कोट-
साताऱ्यात जिल्हाबंदी असल्याने नागरिकांनी वैध कारणांशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात प्रवेश न करता सारोळा सीमेवरून वैध कारणांशिवाय प्रवेश मिळणार नसल्याने सीमेवरून परत जाण्याचा व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा कटू प्रसंग नागरिकांनी टाळावा.
- उमेश हजारे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस स्टेशन
--------
---
23शिरवळ01/02
सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सातारा व शिरवळ पोलिसांकडून जिल्हाबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक वाहनाची व अत्यावश्यक सेवेकरिता लागणारी कागदपत्रांची तपासणी केल्याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांना व वाहनांना प्रवेश दिला जात नव्हता. (छाया : मुराद पटेल)