जिल्ह्याला मिळाली नव्या दमाची ३२ डॉक्टरांची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:02+5:302021-04-28T04:43:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: जिल्ह्यात कोरोनाने माजवलेला हाहाकार थोपविण्यासाठी नव्या दमाची ३२ एमबीबीएस डॉक्टरांची टीम सातारा जिल्ह्याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात कोरोनाने माजवलेला हाहाकार थोपविण्यासाठी नव्या दमाची ३२ एमबीबीएस डॉक्टरांची टीम सातारा जिल्ह्याला मिळाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षानुवर्षे डॉक्टरांची रिक्त पदे होती. मात्र, या कोरोनाच्या संकटात सर्वच्या सर्व ३५ रिक्त जागा भरल्या गेल्यामुळे सिव्हिलच्या डॉक्टरांवरील ताण तर कमी होणारच आहे; शिवाय रुग्णांनाही आता चांगली सेवा मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची महाभयंकर परिस्थिती असून, रोजचे बाधितांचे येणारे आकडे डोळे दीपविणारे आहेत. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. गत दीड वर्षापासून आहे त्याच मनुष्यबळावर जिल्हा प्रशासन काम करीत आहे. परिणामी आरोग्य विभागावर प्रचंड ताण आला आहे. रात्रंदिवस आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका हे काम करत आहेत. असे असताना आता तर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची ही दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी बैठक घेऊन सातारा जिल्ह्याला तातडीने ३२ डॉक्टर देण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी आदेशही दिले आहेत. येत्या दोन दिवसांत हे नवे डॉक्टर जिल्ह्यात रुजू होणार आहेत.
हे सर्व डॉक्टर एमबीबीएस असून, त्यांना एक वर्ष सातारा जिल्ह्यात सेवा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यातील १० डॉक्टर जिल्हा शासकीय रुग्णालय, तर १२ डॉक्टर ग्रामीण रुग्णालय आणि १० डॉक्टर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुजू होणार आहेत. या नव्या दमाच्या डॉक्टरांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडा का होईना कमी होणार आहे. गेली कित्येक वर्षे सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची कमतरता होती. उपलब्ध मनुष्यबळावरच प्रशासन आजपर्यंत काम करत आले आहे. हे कोरोनाचे संकट जोपर्यंत जिल्ह्यातून जात नाही, तोपर्यंत या डॉक्टरांचीही इथेच नेमणूक होणे गरजेचे आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाला दहा डॉक्टर नवे मिळाल्यामुळे रुग्णांची होणारी परवड थांबणार आहे. सिव्हिलमध्ये जिल्ह्यातून रोज अडीच ते तीन हजार रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे डॉक्टरांवर प्रचंड ताण येत असतो, पण आता हा ताण या नव्या डॉक्टरांमुळे निश्चितच दूर होईल.
चौकट : आरोग्य यंत्रणा सक्षम होणार..
जिल्ह्यात १४ टेक्निशियनच्या आणि परिचारिकेच्या रिक्त जागाही पुढील आठवड्यात भरण्यात येणार आहेत. यामुळे आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना चांगली सुविधा मिळेल, असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.
कोट:
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे खरी गरज डॉक्टरांची साताऱ्यात होती. त्यामुळे नवे डॉक्टर देण्यात आले आहेत. मी पूर्वी साताऱ्यात काम केल्यामुळे त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. साताऱ्यात मनुष्यबळ आतापर्यंत भरले गेले नव्हते. यानिमित्ताने का होईना या जागा सर्व भरल्या गेल्या. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन चांगल्या पद्धतीने काम करेल.
डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक, पुणे