जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधित लसी मिळाल्या हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:53+5:302021-04-17T04:38:53+5:30
मोहिमेला गती : लसीकरणासाठी होत असलेले हेलपाटे थांबणार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना प्रतिबंधित लसींच्या लसीकरणामध्ये येणारे अडथळे ...
मोहिमेला गती : लसीकरणासाठी होत असलेले हेलपाटे थांबणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना प्रतिबंधित लसींच्या लसीकरणामध्ये येणारे अडथळे आता दूर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याला शासनाच्या वतीने २५,००० डोस दिले आहेत. तरीदेखील हे डोस मर्यादित लोकांनाच देता येणार आहेत. पुढील चार दिवस हे डोस पुरतील त्यानंतर पुन्हा वेळेत डोस मिळाले तरच मोहीम गतीने सुरू ठेवता येणार आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये ज्या लोकांनी अधिकृतपणे नोंदणी केली आहे, अशा लोकांना लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली तरी पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने लोकांची गैरसोय होताना दिसत आहे. आता प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी २५ हजार डोस पाठवून देण्यात आलेले आहेत.
जिल्हा प्रशासनाने ४४६ लसीकरण केंद्र सज्ज ठेवलेले आहेत. पुरेशी लस उपलब्ध असेल तर एकाच दिवसात ३३००० लोकांना लस देता येऊ शकतात; परंतु लसीचा तुटवडा असल्याने पाच हजारापर्यंत लोकांना लसीकरण करण्यात येते. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी बोलविण्यात येते.
कोरोनाचा प्रकोप झालेला असताना लसीकरण मोहीम वेगाने करून घेणे अत्यावश्यक आहे. राजकीय मंडळी निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने यंत्रणा राबवतात त्याच गतीने लसींचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली तर लोकांची गैरसोय दूर होईल तसेच कोरोनालादेखील रोखता येऊ शकणार आहे. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाखांच्या वर आहे. अजूनही टप्प्याटप्प्याने लसी मिळत आहेत; परंतु ते जरी सातत्याने मिळाले तरीसुद्धा लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकते.
कोट..
शासनाच्या वतीने जिल्ह्याला गुरुवारी २५ हजार लसी मिळाल्या आहेत. आणखी पुढे पाच दिवसांसाठी लसींचे वाटपदेखील तालुक्यांना करण्यात आलेले आहे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी
आज अखेर केलेले लसीकरण
पहिला डोस : ३,३९,५६९
दुसरा डोस : ४३,०६४
एकूण : ३,८२,६३३
शिल्लक लस : २५,०००
लोगो वापरावा : लोकमत फॉलोअप