स्वच्छ सुंदर शहरासाठी जिल्हा सरसावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:59 AM2020-01-23T00:59:09+5:302020-01-23T01:01:33+5:30
राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक मिळविले. आता त्याच्याही पुढे जाऊन स्टार मानांकन मिळविण्याचा नगरपालिकांचा प्रयत्न आहे.
दीपक शिंदे ।
सातारा : ‘स्वच्छ सुंंदर शहर’ अभियानासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायत सरसावली असून, शहर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत आहे. काही नगरपालिकांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवायचाच, या उद्देशाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. तर काहींनी आपले पहिले स्थान कायम राखून पुढील टप्प्यावर झेप घेण्याचे नियोजन केले आहे. कºहाड, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा या नगरपालिकांनी सध्या आघाडी घेतली आहे.
केवळ रस्त्याची स्वच्छता एवढेच अपेक्षित नाही तर शहरातील व्यवहार सुरळीत होऊन जनजीवन सुधारण्याच्या दृष्टीने नगरपालिकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक मिळविले. आता त्याच्याही पुढे जाऊन स्टार मानांकन मिळविण्याचा नगरपालिकांचा प्रयत्न आहे. बकाल आणि भकास वाटणारी शहरेही आता टवटवित आणि उत्साहाने फुललेली पाहायला मिळत आहेत. लोकांना सुविधा देण्याबरोबरच वाया जाणारे पाणी असो किंवा कचरा. याचा पुनर्वापर कसा केला जातो, यालाही महत्त्व आहे.
शहराला चोवीस तास पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी या स्वच्छ सर्र्वेक्षण मोहिमेतील अट आहे. पण सांडपाण्याची काय विल्हेवाट लावली जाते. यावर गुणांकन ठरविले जात आहे. त्यामुळे केवळ चोवीस तास पाणी दिले म्हणजे झाले, असे अजिबात होत नाही. अत्यंत काटेकोरपणे सर्व निकष पाळणाऱ्या नगरपालिकांचाच पुढील टप्प्यासाठी विचार केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कºहाड, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा या नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी होऊन काहीतरी वेगळे करू इच्छित आहेत. त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर यशही मिळत आहे. प्रत्येक नगरपालिकेने आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेगळेपणाच्या आधारावर सर्वांसोबत राहून आपले वैशिष्ट्य त्यांना विजयापर्यंत पोहोचविते.
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गंत सांडपाण्याची व्यवस्था, त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत कशी आहे. पाण्याचा पुनर्वापर कसा केला जातो, कचरा डेपोची व्यवस्था काय आहे, प्लास्टिक निर्मूलनाबाबत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, कचरा कसा गोळा केला जातो, कचºयाचे वर्गीकरण कसे होते, ओला आणि सुका कचरा कशाला म्हणायचे, हॉटेल्स, कार्यालये आणि घरातील कचरा कसा गोळा केला जातो, स्वच्छता कर्मचाऱ्यांना काय सुविधा दिल्या जातात, शहरातून उचललेला कचरा कुठे टाकला जातो. त्या कचºयापासून पुनर्निमिती होते का... कचरा डेपोची व्यवस्था, दुर्गंधी, डेपोने पेट घेणे याबाबत केलेली उपाययोजना पाहिली जाते. स्वच्छतागृहे कशी आहेत. तिथे काय-काय सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच शहरांमधील बागा, स्वच्छता, सीसीटीव्ही हे निकषही पाहिले जातात.
- सातारा पालिकेकडून प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झालेल्या सातारा पालिकेकडून शहरात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रबोधनही केले जात आहे. शहरातील ऐतिहासिक तळी, हौदांची प्राधान्याचे स्वच्छता केली जात आहे. तसेच शासनाची ‘बेस्ट टॉयलेट’ ही संकल्पना साकारण्यासाठी ७१ पैकी १८ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही केले जाणार आहे. सोनगाव डेपोतील घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पात कचºयापासून खतनिर्मिती केली जात असून, याच ठिकाणी प्लास्टिक कचºयाचीही विल्हेवाट लावली जात आहे. शहरातून दररोज संकलित होणाºया ४०० ते ५०० किलो प्लास्टिक कचºयाची बेलिंग मशीनच्या माध्यमातून गठ्ठे तयार केले जात आहे. हे प्लास्टिक पुढे सिमेंट फॅक्टरी व इंधन निर्मितीसाठी उपयोगात आणले जाणार आहे.
क-हाड नगरपालिकेचे वेगळेपण
कचरा डेपोच्या सभोवती बाग...दुर्गंधी नाही
हॉटेल, कार्यालये आणि घरचा कचरा स्वतंत्रपणे गोळा करणे
शहरातील चौकांचे सुशोभीकरण,
सांडपाणी व्यवस्थापनातून खर्च वाचविला
कृष्णा नदी स्वच्छता अभियान राबविले.
शहर स्वच्छतेबरोबरच नदी स्वच्छतेवर भर दिला.
काही भागांत २४ तास पाणी, सध्या तपासणी सुरू
लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम
मलकापूर पालिकेचे वेगळेपण
चौकांचे सुशोभीकरण
घरातील पाण्याचे एकत्रीकरण करून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प केला.
गेली दहा वर्षे चोवीस तास पाणीपुरवठा करणार नगरपालिका
सर्वांना उंचावरून पाणी आणून देण्यात आल्याने वीज खर्च वाचला
खतप्रकल्प राबविला
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती महा ई कंपोस्ट म्हणून खताची विक्री
वृक्षलागवड आणि जपणूक
मुलींच्या नावावर ठेवपावती
गरोदर माता दत्तक योजना
पाचगणी नगरपालिकेचे वेगळेपण
घरोघरी कचरा विलगीकरणासाठी कचरा डबे
पर्यटन स्थळ असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी स्वच्छता डबे
कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प आणि सेंद्रिय शेतीसाठी खतांचा वापर
- पालिकांचे यश
- क-हाड : नगरपालिका राज्यात दोनवेळा प्रथम
- मलकापूर : नावीण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात यश
- पाचगणी : पश्चिम विभागात प्रथम क्रमांक