जि. प.साठी ६३१, तर पं. स.साठी ४२८ अर्ज
By admin | Published: February 4, 2017 12:00 AM2017-02-04T00:00:33+5:302017-02-04T00:00:33+5:30
काँगे्रस, राष्ट्रवादी, विकास आघाडी, शिवसेनेचे सस्पेन्स
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात लगबग वाढली आहे. शुक्रवारअखेर पंचायत समितीसाठी आॅनलाईन पद्धतीने ६३१, तर जिल्हा परिषदेसाठी ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली. शुक्रवारी पंचायत समितीसाठी ७०, तर जिल्हा परिषदेसाठी ३६ जणांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रस, सातारा विकास आघाडी, शिवसेना यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
पंचायत समितीसाठी शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आकडेवारी अशी- सातारा : ६, जावळी : ८, कोरेगाव : ४, माण : २, खटाव : ४, वाई : १, महाबळेश्वर : १, खंडाळा : १, फलटण : ११, कऱ्हाड : २७, पाटण : ५. जिल्हा परिषदेसाठी तिसऱ्या दिवसअखेर ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी येथील जिल्हा बँकेत झाली, तर काँगे्रसच्या वतीने शनिवारी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने अद्याप निर्णय गुलदस्त्यात ठेवला असला तरी अर्ज भरण्याचे खाते खोलले आहे. कोडोली, शेंद्रे, अपशिंगे या गट व गणांतून सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कोडोलीतून दिलीप जाधव, रामदास साळुंखे, मनोज गायकवाड यांनी सातारा विकास आघाडीतून अर्ज दाखल केले. शेंद्रे गणातून पाकिजा मुलाणी, अपशिंगे गणातून पृथ्वीराज निकम यांनी अर्ज दाखल केले. अपशिंगे गणातून विकास जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोडोली गटातून वैजयंतीमाला कदम, शेंद्रे गटातून कृष्णत शेळके (अपक्ष), बाजीराव बाबर (सातारा विकास आघाडी), संजय पोतेकर (सातारा विकास आघाडी) यांनी, तर वर्णे गटातून चंदन शिंदे (राष्ट्रवादी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उदयनराजेंची फौज पुढे...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने सातारा व जावळी या दोन तालुक्यांत काँगे्रसशी आघाडी केली आहे. मात्र, उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. तरीही उदयनराजेंची फौज पुढे होऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहे.