जि. प. अध्यक्षाचा आज फैसला
By admin | Published: July 11, 2016 01:06 AM2016-07-11T01:06:37+5:302016-07-11T01:06:37+5:30
चौघांच्या नावाची चर्चा : राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक; उत्सुकता शिगेला
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत रविवारी इच्छुकांची व सदस्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणून घेतली. बैठकीत सुभाष नरळे, आनंदराव शेळके-पाटील, जयश्री बोडके, मानसिंगराव माळवे यांच्या नावाची चर्चा झाली. दरम्यान, आज, सोमवारी सकाळी दहा वाजता पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा फैसला करण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह सभापती आणि सदस्य उपस्थित होते; मात्र पाच सदस्यांनी दांडी मारली.
अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपद पाटणला द्यावे, अशी आग्रही मागणी या बैठकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केल्याचे समजते. आमदार प्रभाकर घार्गे यांनीही खटाव तालुक्याच पद मिळाले पाहिजे, असा आग्रह धरल्याने रविवारच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. अध्यक्षपदासाठी सर्वच तालुक्यातील सदस्यांनी पक्षाकडे दावा केल्यामुळे आजच्या बैठाकीत रामराजे आणि ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना निर्णय घेता आला नाही. बैठाकीत सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्षपदाचे नाव सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी होणाऱ्या बैठाकीत जाहीर करू, असे रामराजेंनी सांगितले. सर्व इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपदावर दावा केल्याने राष्ट्रवादीसमोर कुणाच्या नावाची घोषणा करायची, असा मोठा पेच निर्माण झाला आहे.
(प्रतिनिधी)
हे आहेत इच्छुक...
इच्छुकांची संख्या जास्त असली तरी माण गटातील सुभाष नरळे, लोणंद गटातील आनंदराव शेळके-पाटील, पाटण जयश्री बोडके, मानसिंगराव माळवे आदींची नावे आघाडीवर आहेत. या चारपैकी एकाचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चीत होणार असल्याचे बोलले जात आहे.