जिल्हा अंशत: अनलाॅक, मात्र म्हसवड काही दिवस लाॅकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:21+5:302021-06-09T04:49:21+5:30

म्हसवड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: अनलाॅक जाहीर केला होता. त्याप्रमाणे म्हसवड शहरातील दुकानदारांनी अत्यावश्यक सेवेची ...

District partially unlocked, but Mhaswad locked for a few days! | जिल्हा अंशत: अनलाॅक, मात्र म्हसवड काही दिवस लाॅकच!

जिल्हा अंशत: अनलाॅक, मात्र म्हसवड काही दिवस लाॅकच!

Next

म्हसवड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: अनलाॅक जाहीर केला होता. त्याप्रमाणे म्हसवड शहरातील दुकानदारांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी बारा वाजेपर्यंत उघडली; पण नंतर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून यापूर्वीचा शहरात कंटेन्मेंट झोनचा आदेश पूर्ववत ठेवल्याचे जाहीर केल्याने जिल्हा जरी अंशत: अनलाॅक झाला असला तरी म्हसवड अद्यापही लाॅक ठेवल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जिल्ह्यातील म्हसवड या शहरात सोमवारी सकाळी नऊपासून अत्यावश्यक सेवेतील किराणा मालासह इतर अनेक दुकाने खुली झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. परंतु रुग्णसंख्येचा विचार करून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी गावातील दुकाने अजून काही दिवस बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.

त्यानुसार मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे यांच्यासमवेत पालिका कर्मचाऱ्यांनी म्हसवड शहरात संयुक्तपणे फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. काही व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असताना असे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शहरातील रुग्णसंख्या लक्षात घेता काही दिवस दुकाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील आदेश येईपर्यंत म्हसवड शहरात केवळ मेडिकल, कृषी विभागाची दुकाने, दूध वितरण, संकलन तसेच घरपोच भाजीपाला आदी गोष्टी सुरू राहतील, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. नागरिकांनी आतापर्यंत केलेले सहकार्य असेच पुढे काही दिवस करावे, असे आवाहनही केले.

सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड आकारण्यात यावा. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक-कर्मचारी किंवा ग्राहकांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. जर एखादा ग्राहक कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत नसेल तर संबंधित दुकानदार व ग्राहकाला १००० रुपये दंड आकारण्यात येईल, वारंवार नियमांचे उल्लंघन त्याच दुकानदाराकडून झाल्यास केंद्र शासनाच्या जितक्या कालावधीसाठी कोरोना साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल, तितक्या कालावधीसाठी संबंधित आस्थापना दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(चौकट)

मंगळवारी आंदोलनाचा इशारा...

म्हसवडकर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी यासंदर्भात म्हसवड नगरपालिकेला आंदोलनाचे पत्र देऊन मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटलं आहे की वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीआरमुळे गेली दोन महिने बंद असलेले म्हसवड शहर सोमवारी चालू होऊनही पुन्हा बंद करण्यात आले. तरी शहरातील सर्व किरकोळ व होलसेल अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनी मंगळवारी नगरपालिकासमोर राहण्याचे आवाहन सर्व म्हसवडकर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: District partially unlocked, but Mhaswad locked for a few days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.