जिल्ह्याला लसीचे मिळाले दीड लाख डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:24+5:302021-09-08T04:47:24+5:30
सातारा : जिल्ह्याला प्रथमच कोरोना लसीचे १ लाख ४७ हजार डोस मिळाले आहेत. यामुळे बुधवारी महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार ...
सातारा : जिल्ह्याला प्रथमच कोरोना लसीचे १ लाख ४७ हजार डोस मिळाले आहेत. यामुळे बुधवारी महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रात आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण ही लसीकरण मोहीम बारगळली होती; पण नंतर काही दिवसांनी पुन्हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सव्वानऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.
जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ३०० हून अधिक केंद्रांत सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात; पण सोमवारी जिल्ह्याला कोरोना लसीचे तब्बल १ लाख ४७ हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लस मिळालेली आहे. यामध्ये कोविशिल्डचे १ लाख ४१ हजार, तर कोव्हॅक्सिनचे ६४०० उपलब्ध झाले आहेत. यामुळे बुधवारी जिल्ह्यात कोरोनाच्या महालसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कारणाने एकाच दिवसात लसीकरणाचा नवा उच्चांक होणार आहे.
चौकट :
लसीबाबत आवाहन...
जिल्ह्यात बुधवारी कोरोना लसीबाबत महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १८ वर्षांवरील लाभार्थ्यांनी जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राजकीय पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
.............................................................