जिल्ह्याला महिन्यात मिळाले लसीचे अवघे सव्वा लाख डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:43+5:302021-06-01T04:29:43+5:30
सातारा : जिल्ह्याची दररोज एक लाख लोकांना कोरोना लसीकरण करण्याची क्षमता असतानाही मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ...
सातारा : जिल्ह्याची दररोज एक लाख लोकांना कोरोना लसीकरण करण्याची क्षमता असतानाही मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या मोहिमेला अनेक वेळा ब्रेक बसत आहे. मे महिन्यात तर आठ वेळाच लस मिळाली. पण, डोस १ लाख २० हजारच उपलब्ध झाले. तर आतापर्यंत जिल्ह्यातील सव्वासात लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला. मात्र, लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे ही मोहीम बारगळली. सध्या फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील सव्वानऊ लाखांवर कोरोना लस लाभार्थी असून, १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत.
जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात केंद्रे सुरू असतात. ४४० हून केंद्रांत लसीकरण सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात.
जिल्ह्याला मे महिन्यात फक्त आठ वेळाच कोरोनाची लस उपलब्ध झाली. ४ मे, ९ मे, ११, १५, १८ मे तसेच २३, २५ आणि ३० मे या दिवशीच लस आली. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोस मिळाले. पण, प्रत्येक वेळी काही हजारांतच लस आली. त्यामुळे मे महिन्यात एकूण १ लाख २० हजार डोसच उपलब्ध झाले. त्यामुळे अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली. तसेच नागरिकांनाही हेलपाटा बसला.
पॉइंटर :
- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना डोस ७४९८५०
- लसीकरण झाले ७३४१४७
ज्येष्ठ नागरिक
- प्रथम डोस २६३१३८
- दुसरा डोस ४९९८४
४५ ते ५९ वयोगट
- प्रथम डोस २५५३६४
- दुसरा डोस ३०६६७