जिल्हा पुन्हा गारठला
By admin | Published: December 17, 2014 10:06 PM2014-12-17T22:06:23+5:302014-12-17T23:01:26+5:30
शेकोट्या पेटल्या : महाबळेश्वरचा पाराही उतरला
सातारा : देशासह राज्यात सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचा पारा खालावला आहे. साताऱ्याचे तापमान चक्क दहा अंशपर्यंत उतरल्याने सर्वत्र हुडहुडी भरली आहे. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचे तापमान मंगळवारी दहा तर बुधवारी नऊ अंश सेल्सिअस पर्यंत उतरले होते.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे सर्वत्रच थंडीचे प्रमाण वाढले असून, प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
डिसेंबर महिन्यात दहा अंश सेल्सिअस या सर्वात कमी तापमानाची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी चक्क नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खालावला. महाबळेश्वरसह जिल्ह्यातील वाई, खंडाळा, जावळी, फलटण, कऱ्हाड अशा प्रमुख ठिकाणी हिवाळ्यामध्ये वळवाने हजेरी लावल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी कमाल तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस असून, किमान तापमानाची नऊ ते तेरा अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी पहाटे व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून, वळवाने हजेरी लावल्यास पारा अधिक खालावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
सातारा - 10
कऱ्हाड - 12
वाई - 9
खंडाळा - 9
महाबळेश्वर - 9
फलटण - 10
जावळी - 9
माण - 11
खटाव - 12
कोरेगाव - 11
पाटण - 10