दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला
By admin | Published: June 6, 2017 12:55 AM2017-06-06T00:55:04+5:302017-06-06T00:55:04+5:30
दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : सातारा, जावळी व वाई तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पाचवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकऱ्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी महामार्ग रोखून धरत शासानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून भाजपा सरकार विरोधात जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करीत बंद यशस्वी करण्यात आला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांकडून उडतरे येथे महामार्गावर टायर पेटवून वाहतूक अडविण्यात आली
तीन तालुक्यांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पाचवड या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोरेगावचे आमदार शशिकांत शिंंदे, वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन समितीचा अहवाल, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालास हमीभाव याबाबत भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही, त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असे विविध अनुभव उपस्थितांपुढे मांडत आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर निषेध करताच उपस्थित शेतकऱ्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत महामार्ग अर्धा तास रोखून धरला.
दरम्यान उडतरे गावानजीक महामार्गावर शेतकऱ्यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूला भलेमोठे टायर पेटवल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाचवड येथे तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला व पेटलेले टायर महामार्गावरून बाजूला काढले. किसन वीर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला.