जिल्ह्याची तब्बल २७९ कोटी रुपयांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:47+5:302021-07-02T04:26:47+5:30
सातारा : कोरोनाकाळातील वीजबिल वसुलीसाठी थेट कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिल्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा ...
सातारा : कोरोनाकाळातील वीजबिल वसुलीसाठी थेट कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिल्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात शेतीपंपाचे वगळून तब्बल २७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांना वीज तोडण्याचा इशारा न देता बिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका कंपनीने घेणं आवश्यक आहे.
दरम्यान, भरणा सुलभ व्हावा, यासाठी थकबाकीचे हप्ते पाडून देण्याची योजना सुरू करणे हाही उत्तम पर्याय ठरू शकतो. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या वेळी जीवनावश्यक गरजेची दुकाने सोडली तर सर्वच दुकाने प्रशासनाने बंद केली. काही व्यावसायिकांनी दुकाने पुढं बंद ठेवून मागच्या दाराने व्यवसाय केले. मूठभर ग्राहकांसाठी सर्व यंत्रणा सुरू राहिल्याने वीजबिलं वाढलं. अजिबातच ग्राहक फिरकत नाही आणि दुकानात माल पडून राहण्यापेक्षा तो थोडा जादा दराने विकून नफा कमवण्याचा मोह काही व्यावसायिकांना झाला. परिणामी त्यांनी व्यावसायिक विजेचा वापर केला आणि बिलाचा आकडा वाढला.
कोविडकाळात म्हणजे एप्रिल २०२० पासून वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील १४ लाख ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यांत करण्याचे निर्देश कंपनीच्या पुणे विभागीय संचालकांनी दिले होते. यावरून ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली. लॉकडाऊन असल्याने आम्ही वीज वापरली नाही, असं व्यापारी म्हणतायत तर वीज वापरली म्हणून बिल आले हे महावितरणचे मत आहे.
कंपनीकडून ग्राहकांसमोर वस्तुस्थिती मांडून सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज कंपनीने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहकांनी एकही वीजबिल भरले नाही. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ३९ हजार ५८ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे २७९ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
कोट
ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीजखरेदी करावी लागत असून विजेच्या वाहतुकीवरही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी
चौकट :
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येणार आहे.
विज वितरणाचा खर्चही अफाट
महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या थकीत वीजबिलांचा भरणा करावा. वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसांत या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
पॉर्इंटर
३ लाख ३९ हजार ५८ ग्राहक
२७९ कोटी रूपयांची थकबाकी
विभागानिहाय थकबाकी
उपविभाग : वीज ग्राहक : रक्कम लाखांत
कऱ्हाड : ९१२९३ : ५५८८.३३
फलटण : ६४७१९ : ९१७०.७३
सातारा : ८०१३७ : ६१८२.१४
वडूज : ५८०७१ : ४८२३.७४
वाई : ४४८३८ : २१६०.३८