पोषण आहाराची रक्कम मुख्याध्यापकांच्या नावे वर्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:23+5:302021-07-03T04:24:23+5:30
वरकुटे-मलवडी : जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या नावे जमा करण्यासाठीचे एक परिपत्रक शिक्षण संचालनालय यांनी ...
वरकुटे-मलवडी : जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या नावे जमा करण्यासाठीचे एक परिपत्रक शिक्षण संचालनालय यांनी नुकतेच काढले आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्याचे आदेश पारित केल्याने ऐन कोरोना काळात पालकांची द्विधा अवस्था झाली आहे.
कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढायला गेल्यास झिरो बॅलन्सने खाते काढले तरी, खात्यात कमीत कमी पाचशे किंवा हजार रुपये रक्कम भरा असे सांगतात. सध्या कोविडसदृश परिस्थिती बोकाळली असून, लहान मुलांना सोबत घेऊन बँकेत जाणे जोखमीचे व भीतिदायक स्वरुपाचे ठरू शकते. त्याचबरोबर सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, पालकांना बँकेत जाऊन दिवसभर रांगेत तिष्ठत बसावे लागते. शिवाय रांगेत उभा राहून नंबर आला की, बँकवाले सांगतात की, नवीन खाते लगेच निघणार नाही आणि झिरो बॅलन्सने खाते काढले तरी, खात्यात किमान पाचशे किंवा हजार रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. अशा चित्रविचित्र परिस्थितीमुळे पालक त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची बँकेत खाती काढण्यापेक्षा शालेय पोषण आहाराची रक्कम मुख्याध्यापकाच्या नावे वर्ग करावी व मुख्याध्यापकांनी याची रक्कम मुलांना विभागून द्यावी, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे. यामुळे पालकांचा व मुलांचा नाहक वेळ वाया जाणार नाही. त्याचबरोबर सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे व अशा परिस्थितीत पालकांसह मुलांना बँकेत जाणे धोकादायक आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शालेय पोषण आहाराची रक्कम मुख्याध्यापकांच्या नावे वर्ग करावी, अशी मागणी समस्त पालकांनी केली आहे.