मुंबई विद्यापीठाचे विभाजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:36+5:302021-04-03T04:35:36+5:30

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबई येथील काळबादेवी भागात भव्य ...

Divide Mumbai University | मुंबई विद्यापीठाचे विभाजन करा

मुंबई विद्यापीठाचे विभाजन करा

Next

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबई येथील काळबादेवी भागात भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य शासन व मुंबई महानगरपालिका यांनी उभारावे तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र होणाऱ्या विद्यापीठाला 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ' असे नाव द्यावे, अशी मागणी करणारा विशेष ठराव महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ हे होते.

नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सभेमध्ये, राज्य शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी दहा कोटींची तरतूद केली तसेच 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या जन्मगावी संस्थेने उभारलेल्या स्मारकाच्या दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी तसेच रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका विशेष ठरवान्वये कौतुकही करण्यात आले. त्याला अनुसरून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सध्याच्या रुपये ११ हजार प्रतिमहिना मानधनात वाढ करून प्रत्येकी रुपये २० हजार मानधन १ एप्रिलपासून देण्यात यावे व त्यासाठी आणखी जादा रुपये १५ कोटींची तरतूद नजीकच्या पावसाळी अधिवेशनातील पूरक मागण्यांमध्ये करण्यात यावी. तसेच कोरोनाकाळात कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोरोना योद्धे म्हणून कार्यरत असणाऱ्या व निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रुपये ५० लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणीही राज्य शासनाकडे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून रवींद्र बेडकीहाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघातर्फे कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी विषयपत्रिका वाचून २०१९-२०२० ची आर्थिक पत्रके व कार्य अहवाल सादर केला. विषयपत्रिकेवरील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेसाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्‍वस्त गोविंद बेडकिहाळ, गजानन पारखे, अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ तसेच संपादक सहकारी संघाचे बाळासाहेब आंबेकर, अ‍ॅड. रोहित अहिवळे, विनायक खाटपे, भाऊसाहेब नलावडे, प्रसन्न रुद्रभटे यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विजय मांडके व अमर शेंडे यांनी आभार मानले.

Web Title: Divide Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.