तहसील कार्यालयाच्या पायरीवरच दिली दिव्यांगाना शिधापत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:16+5:302021-07-12T04:24:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये माणुसकी असेल तर शासकीय कामे पटकन होतात, याचा अनुभव खटाव तहसील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये माणुसकी असेल तर शासकीय कामे पटकन होतात, याचा अनुभव खटाव तहसील कार्यालयात नागरिकांना अनुभवायला मिळाला. तहसील कार्यालयात निघालेल्या दिव्यांग दाम्पत्याला कार्यालयाच्या पायरीवरच तहसीलदार किरण जमदाडे यांनी शिधापत्रिका उपलब्ध करुन दिली.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमात प्रांताधिकारी जर्नादन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदानानंतर तहसील कार्यालयात येताना कोकराळे (ता. खटाव) येथील दिव्यांग हणमंत पवार व त्यांची पत्नी हे दुबार शिधावाटप पत्रिका घेण्यासाठी खटाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात निघाले होते. त्याचवेळी सकाळी शासकीय कामकाजावेळी तहसीलदार किरण जमदाडे हे दालनात निघाले होते. तहसील कार्यालयाच्या पायरीवरच बसलेल्या पवार कुटुंबीयांचा त्यांच्या चाणाक्ष नजरेने वेध घेतला. त्यांनी आस्तेवाईकपणे त्यांच्याकडे चौकशी केली असता, पवार कुटुंबीय हे कोकराळे येथून दुबार शिधावाटप पत्रिकेसाठी आल्याचे समजले. त्यांनी जवळ बोलावून दिलासा देत पुरवठा शाखेतील यंत्रणेला सूचना केली. त्यानुसार पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, उपलेखपाल निवास कदम यांनी तातडीने कागदपत्रांची पडताळणी करून शिधावाटप पत्रिका तयार करण्यासाठी गतिमान हालचाली केल्या. अनेकदा शासकीय कामासाठी आलेल्या माणसांच्या कागदपत्रांमधील त्रुटींमुळे कामाला विलंब होतो. ज्यांच्या कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता होते, त्यांचे काम विनाविलंब होते, हे अधोरेखित झाले आहे.
पुरवठा शाखेतून आतापर्यंत शासनमान्य ६९ हजार २८८ शिधापत्रिकांचे वाटप करून पुरवठा शाखेने सामान्य माणसांना न्याय दिला आहे. पाच मिनिटात शिधावाटप पत्रिका देऊन ‘शासकीय काम आणि फक्त पाच मिनिटे थांब’ असा सुधारित अनुभव दिला आहे.
चौकट
कामाची चांगली बाजूही समोर
शासकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी होतच असतात पण, चांगल्या कामाचे मनापासून कौतुक करून खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव यांनी खटाव तालुक्यातील प्रशासनाची चांगली बाजू जनतेसमोर आणली आहे.
फोटो :
वडूज तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसलेल्या दिव्यांगाची आपुलकीने चौकशी करून तहसीलदार किरण जमदाडे यांनी त्याचे काम मार्गी लावले. (छाया : शेखर जाधव)