ग्राहकांची दिवाळी, झेंडू उत्पादकांचं दिवाळं

By admin | Published: October 30, 2016 11:42 PM2016-10-30T23:42:44+5:302016-10-30T23:42:44+5:30

दर गडगडले : दहा रुपये किलोनेही खपेना; रस्त्यावर झेंडू टाकून शेतकरी परतले घरी

Diwali for consumers, marigold producers, Diwali | ग्राहकांची दिवाळी, झेंडू उत्पादकांचं दिवाळं

ग्राहकांची दिवाळी, झेंडू उत्पादकांचं दिवाळं

Next

कऱ्हाड / मलकापूर : झेंडू फुलांचा दसऱ्यावेळी किलोला २० ते ५० रुपये दर मिळाला; मात्र दिवाळीला झेंडूचे दर १० ते २० रुपये प्रतिकिलो असे गडगडल्याने जादा दर मिळण्याची अपेक्षा बाळगणारा झेंडू उत्पादक शेतकरी तोट्यात आला, तर किरकोळ विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलविलेला झेंडू पाडव्याच्या मुहूर्तावर कोमेजून गेला. रविवारी सायंकाळी झेंडूचा ढीग रस्त्याकडेला टाकूनच काही शेतकरी घरी परतले.
नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकांकडे वळत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीतून चार पैसे जादा मिळविण्यासाठी फूल, तसेच फळांची शेती करण्यावर भर दिला आहे. त्यातील एक म्हणजे सणासुदीला चांगले पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे झेंडूच्या फुलांचे उत्पादन होय. त्याच्यापासून जादा पैसे मिळतात. यावर्षी कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील झेंडूचे उत्पादन घेतले आहे. यावर्षी झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादनघेणाऱ्या शेतकऱ्यांना झेंडूच्या अचानक गडगडलेल्या दरामुळे चांगलाच फटका बसला आहे.
झेंडूच्या रोपांची लावणी केल्यापासून ते उत्पादन बाजारात पोहोच करण्यापर्यंतचा उत्पादन खर्चाचा विचार करता फुलांना दसरा व दिवाळीला मिळालेला दर शेतकऱ्याला तोट्यातच घेऊन जाणारा ठरला आहे.
दसऱ्याला जेमतेम फुलांना २० ते ४० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. दसऱ्याला नाही तर दिवाळीला तरी योग्य दर मिळेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली होती; मात्र दिवाळीला तर एक किलो झेंडूच्या फुलांना १० ते २० रुपयांनाही ग्राहक मिळेना, अशी अवस्था झाली. दिवसभर ओरडून-ओरडून घसा कोरडा झाला तरी ग्राहकांची पावले आपल्याकडे वळत नसल्याचे पाहून ऐन सणासुदीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवे दाटून आली. शेतीत घातलेल्या खर्चाएवढाही पैसा मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. त्याचबरोबर सिझनल व्यवसाय करणारे व्यावसायिकही घाऊक पद्धतीने खरेदी केलेल्या दरापेक्षा कमी दराने फुलांची किरकोळ विक्री करावी लागल्याने अडचणीत आले आहेत.

२० रुपये खरेदी, १० रुपये विक्री
कोणताही व्यवसाय करून चार पैसे कमाविण्याचा अनेकांचा उद्योग असतो. त्यानुसार दिवाळीला झेंडूच्या फुलांचा व्यवसाय करायचा या उद्देशाने अनेकांनी १५ ते २५ रुपये प्रतिकिलो झेंडूच्या फुलांची घाऊक पद्धतीने खरेदी केली होती. मात्र, गेली दोन दिवसांपासून सातत्याने फुलांचे दर गडगडून तो पाच ते १० रुपयाने खाली आल्याने असे छोटे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.


 

Web Title: Diwali for consumers, marigold producers, Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.