दिवाळीमुळं वाहन बाजार सुसाट; आगाऊ बुकिंग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:52 AM2017-10-13T00:52:43+5:302017-10-13T00:52:43+5:30
दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काही नोकरदारांचा बोनस झाला आहे किंवा काहीजणांचा होणार आहे. परंतु, अनेकांची पावले दुचाकी बाजाराकडे वळायला लागली आहेत. यंदाची दिवाळी संस्मरणीय ठरविण्यासाठी वाहन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दसºयापेक्षा दुपटीनं उलाढाल होण्याची शक्यता दुचाकी-चारचाकी विक्रेत्यांमधून व्यक्त केली जात आहे.
घरातील प्रत्येकजण दिवाळीचं नियोजन करत असतो. तसेच कुटुंब प्रमुखही प्रत्येकाच्या आवडी-निवडींचा विचार करून खरेदीचं नियोजन करत असतो. मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात जाते. रिक्षाने जायचं म्हटल्यावर गर्दीत हाल होतात. घरी यायला उशीर लागतो. हा विचार करून यंदाच्या दिवाळीत घरात दुचाकी आणण्याचा संकल्प केला जात आहे.
त्याचप्रमाणे मंडई आणणं, मुलांना शाळेत, शिकवणीला सोडणं-घरी आणणं ही कामे नोकरी, व्यवसाय सांभाळून करावी लागतात. कामाचा ताण कमी करण्याच्या निमित्ताने काहींच्या घरी यंदा दुचाकी येणार आहे. सौभाग्यवतीला गाडी घेऊन दिली तर अनेक कामे ते करतील अन् आपल्याला आराम करायला मिळेल, हा त्यामागचा हेतू असला तरी घरी चारचाकी आणायची, हे मात्र नक्की केलं आहे.
यंदा पाऊसही चांगला झालेला असल्याने गणेशोत्सव, दसरा या सणाला मोठी उलाढाल झाली आहे. साहजिकच दिवाळीचा सणही चांगला जाण्याची आशा आहे. त्यामुळे वाहन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करून ठेवले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शोरूम विद्युत रोषणाई, आकाश कंदिलांनी सजविले आहेत. यासाठी काहींनी अर्थसहाय्यही उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. तर काहींनी घवघवीत सूट देऊ केली आहे.
पाडव्याच्या मुहूर्ताला घरी
ऐन सणाच्या तोंडावर हव्या त्या रंगाच्या गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी ठराविक रक्कम भरून आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. या गाड्या पाडव्याच्या मुहूर्तावर घरी आणल्या जाणार आहेत.