घोगाव येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:34+5:302021-09-10T04:46:34+5:30
कऱ्हाड : घोगाव (ता. कऱ्हाड) येथील श्री संतकृपा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने माऊलींचा ...
कऱ्हाड : घोगाव (ता. कऱ्हाड) येथील श्री संतकृपा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने माऊलींचा ७२५ वा समाधी सोहळा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी हभप संजय भावके यांच्यावतीने ७२५ ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आले. अखंड हरिनाम, प्रवचन, कीर्तन, वाचन यासह विविध कार्यक्रम झाले.
प्रतिआळंदी म्हणून घोगाव येथील श्री संतकृपा मंदिरची तालुक्यात ओळख आहे. या मंदिरात हभप संजय भावके यांच्यावतीने वर्षभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यास ७२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यभर सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून या मंदिरात हा कार्यक्रम झाला. श्री ज्ञानेश्वर माऊली जलाभिषेक, ज्ञानेश्वरी अध्याय नऊ व बारा याचे वाचन, राम कृष्ण हरी सामुदायिक जप, प्रवचन हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. हभप दादा महाराज तुळसणकर यांच्याहस्ते ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भावके व शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल नर्सिंग सायन्सेस व गुरुकुल स्कूलच्यावतीने करण्यात आले. प्रास्ताविक प्राजक्ता सोळुंकुरे यांनी केले. सूत्रसंचालन आशा जकनुरे यांनी केले. घरोघरी एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण करून हे वर्ष साजरे करावे, असे आवाहन संजय भावके,ग् रामपंचायत सदस्य सुनंदा भावके यांनी केले आहे. यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते.
घोगाव (ता. कराड) येथे श्री ज्ञानेश्वरी समाधी सोहळा निमित्ताने ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करताना संजय भावके, दादा महाराज तुळसणकर आदी मान्यवर.