केंद्रीय रस्ते निधीतून पूल, रस्त्याची कामे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:16+5:302021-07-29T04:38:16+5:30

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे ...

Do bridge, road works from Central Roads Fund! | केंद्रीय रस्ते निधीतून पूल, रस्त्याची कामे करा!

केंद्रीय रस्ते निधीतून पूल, रस्त्याची कामे करा!

Next

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पुलांची कामे तत्काळ होणे आवश्यक असल्याने त्यातील काही पुलांची कामे केंद्रीय रस्ते निधीमधून करावीत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आलेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. दिल्लीत पोहोचताच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तातडीने भेट घेऊन जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांचा प्रश्न मांडला.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसह, रस्ते, पूल व नाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पुलांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पूल हे जुन्या पद्धतीचे, कमी उंचीचे असल्याने अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक बनतात. पावसाळ्यात या मार्गांवरील दळणवळण ठप्प झाल्याने नागरिकांचा सतत संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व काही ठिकाणी नवे पूल होणे गरजेचे आहे. त्यातील काही पूल हे तातडीने केंद्रीय रस्ते निधीमधून करावेत. त्यामुळे विस्कळीत झालेली दळणवळण सुविधा पुन्हा प्रस्थापित होतील.

दरम्यान, सातारा दौऱ्यात असताना रस्ते व पुलांच्या महत्त्वपूर्ण कामांबाबत जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाशी त्यांनी चर्चा केली होती. त्याआधारे संबंधित कामे नितीन गडकरी यांच्याकडे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रस्तावित केली आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सारंग पाटील हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Do bridge, road works from Central Roads Fund!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.