केंद्रीय रस्ते निधीतून पूल, रस्त्याची कामे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:38+5:302021-08-02T04:14:38+5:30
लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आलेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. दिल्लीत ...
लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आलेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. दिल्लीत पोहोचताच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तातडीने भेट घेऊन जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांचा प्रश्न मांडला.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसह, रस्ते, पूल व नाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पुलांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पूल हे जुन्या पद्धतीचे, कमी उंचीचे असल्याने अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक बनत असतात. पावसाळ्यात या मार्गावरील दळणवळण ठप्प झाल्याने नागरिकांचा सतत संपर्क तुटत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व काही ठिकाणी नवे पूल होणे गरजेचे आहे. त्यातील काही पूल हे तातडीने केंद्रीय रस्ते निधीमधून करावेत. त्यामुळे विस्कळीत झालेली दळणवळण सुविधा पुन्हा प्रस्थापित होतील.
दरम्यान, सातारा दौऱ्यात असताना रस्ते व पुलांच्या महत्त्वपूर्ण कामांबाबत जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाशी त्यांनी चर्चा केली होती. त्याआधारे संबंधित कामे नितीन गडकरी यांच्याकडे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रस्तावित केली आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सारंग पाटील हेदेखील उपस्थित होते.
फोटो : ०१केआरडी०१
कॅप्शन : सातारा जिल्ह्यातील रस्ते व पुलांसाठी निधी देण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.