खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते अन् बियाणे कमी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:12+5:302021-05-18T04:41:12+5:30

सातारा : ‘खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ...

Do not allow farmers to run out of fertilizers and seeds during kharif season | खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते अन् बियाणे कमी पडू देऊ नका

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते अन् बियाणे कमी पडू देऊ नका

Next

सातारा : ‘खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ४४ हजार ५३५ क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे केली आहे. हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खते व बियाण्यांपासून शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी’, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

सातारा येथे जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली असली तरीही राज्यासह देशात कृषी उत्पन्न वाढले आहे, असे सांगून पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यात अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यावर कृषी विभागाने भर द्यावा तसेच खतांचा अधिकचा स्टॉक करून ठेवावा.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, खंडाळा, फलटण आणि माण तालुक्यात उन्हाळी कापूस पीक घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना चांगले ‍बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यात यावे.

खरीप हंगामात खासगी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. त्याचबरोबर कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, अरुण लाड यांनीही सूचना केल्या.

या बैठकीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी प्रास्ताविक केले.

फोटो १७सातारा ॲग्रो फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे सोमवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळसाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. (छाया : जावेद खान)

.........................................................................

Web Title: Do not allow farmers to run out of fertilizers and seeds during kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.