माझिया प्रियाला धोका कळेना...!

By admin | Published: July 9, 2015 09:23 PM2015-07-09T21:23:52+5:302015-07-10T00:35:28+5:30

प्रेमिकांची बेफिकिरी : शहराबाहेर एकान्ताचा शोध घेणारी युगुले ठरताहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे बळी

Do not be afraid of Maia Priya ...! | माझिया प्रियाला धोका कळेना...!

माझिया प्रियाला धोका कळेना...!

Next

सातारा : प्रेम या तारुण्यसुलभ भावनेला महाविद्यालयीन जीवनात उधाण येते. प्रेमालापासाठी युगुले शहराच्या जवळपास फिरताना हमखास दिसतात. तथापि, तेथील धोके त्यांना ठाऊक नसतात. त्यामुळे अनेक अनुचित घटना साताऱ्याच्या आसपास घडल्या असून, बभ्रा होण्याच्या धास्तीने त्यापैकी बहुतांश घटनांची पोलीसदप्तरी नोंद नाही.
स्कार्फ बांधलेली युवती दुचाकीवर युवकाच्या मागे बसून जातानाचे दृश्य निसर्गरम्य साताऱ्याच्या आसपास नेहमी दिसते. एकान्ताच्या शोधात फिरणाऱ्या या तरुणाईवर गुन्हेगारी प्रवृत्ती लक्ष ठेवून असते. युगुलाला धाक दाखवून लुटले जाते. विरोध केल्यास मारहाण होते. काही वेळा युवतीशी असभ्य वर्तन केले जाते. परंतु फिरायला गेल्याचे दोघांपैकी कोणाच्याच घरी माहीत नसल्याने अशा वेळी पोलिसांची मदत घेतली जात नाही. अजिंक्यतारा, कुरणेश्वर परिसर, यवतेश्वर, कास, कण्हेर धरण या परिचित ठिकाणांबरोबरच प्रेमिकांची भेटण्याची अनेक नवीन ठिकाणे तयार होत आहेत.
पोलिसांच्या गस्ती वाहनासोबत अशा काही धोकादायक ठिकाणांना भेट दिली असता, धोका पत्करणाऱ्या युगुलांची संख्या आणि ‘धाडस’ किती वाढले आहे, याचा प्रत्यय आला. एका युगुलाची दुचाकी पोलिसांनी अडविली. ‘गाडी चालविणारा कोण आहे,’ या प्रश्नाला युवतीने ‘माझा बॉयफ्रेन्ड’ असे ‘बोल्ड’ उत्तर दिले. ‘तुम्ही फिरायला आलात ते घरी माहीत आहे का,’ या प्रश्नाला अर्थातच नकारार्थी उत्तर होते. ‘कुठे चाललात,’ या प्रश्नाला नेमके उत्तर देऊन तरुणाने न घाबरता लायसेन्स दाखविले. नात्यात हस्तक्षेपाचा अधिकार पोलिसांना अर्थातच नव्हता; पण विपरीत घडल्यास जबाबदारी होतीच! त्यामुळं पोलिसांनी हिताच्या चार गोष्टी दोघांना सांगितल्या. (प्रतिनिधी)


वाढतायत लुटालुटीच्या घटना
शाहूपुरी-कोंडवे रस्त्यावर माळवाडीच्या पुढे डावीकडे अंबेदऱ्याचा डोंगर दिसतो. त्याच्या पायथ्याशी, झाडांखाली सायंकाळी प्रेमीयुगुले नेहमी येतात. सुमारे महिन्याभरापूर्वी या ठिकाणी चाकूचा धाक दाखवून दागिने आणि मोबाइल असा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदही आहे. अनेक गुन्हेगारीवृत्तीच्या व्यक्तींचे येणाऱ्या-जाणाऱ्या जोडप्यांवर बारीक लक्ष असते. तरीही या ठिकाणी अंधार पडल्यानंतर जाऊन जोडपी धोका पत्करतातच. येथून पुढे गेल्यावर ओढ्यावरील पूल आणि वळणाच्या आसपास असलेल्या मोठमोठ्या दगडांचा आडोसा घेणारी युगुले नेहमी आढळतात. हा परिसर निर्मनुष्य असून शाहूपुरी ते कोंडवे रस्त्यावर वाहतूकही तुरळक असते. ओढ्याच्या परिसरातील मोठ-मोठे दगड युगुलांना आडोसा देतात. पण, त्याच आडोशाच्या आड दडलेला धोका युगुलांकडून नजरेआड होतो.

वर्ये गावाच्या पुढे जेथे पुणे-बेंगलोर हमरस्ता सोडून गाड्या साताऱ्याकडे वळतात, त्या उड्डाणपुलाच्या पुढे त्याच रस्त्यावर अनेक युगुले जातात. महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला वाढे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही प्रेमिकांची ये-जा असते. या परिसरात युवतीचा गैरफायदा घेतला गेल्याच्या तसेच लुटालुटीच्या घटना घडल्याचे बोलले जाते; मात्र फिर्याद दाखल नाही. दक्षता म्हणून तालुका पोलिसांचे वाहन सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत या परिसरावर लक्ष ठेवते.

प्रेमातील वैफल्यातून आत्महत्या, एकतर्फी प्रेमातून हल्ले याबरोबरच प्रेमिकांच्या एकान्ताचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारांची समस्याही वाढत आहे. त्यामुळे प्रेमिकांनी एकान्त शोधताना धोक्याचा विचार आधी करावा.
- दत्तात्रय नाळे,
पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

गणेश खिंडीच्या पुढील बाजूस जेथून उरमोडी धरणाचा नजारा दिसतो, त्या ठिकाणी दगडांच्या आड युगुले येऊन गेल्याच्या ‘खाणाखुणा’ नेहमीच पाहायला मिळतात. परंतु जवळच खोल दरी असून, पाय घसरून किंवा तोल जाऊन खाली पडण्याची भीती अनेकजण दुर्लक्षित करतात.

गणेश खिंडीच्या पुढे जेथून कण्हेर धरणाचे दृश्य दिसते, तेथून पुढे दगडाच्या कपारींचा आडोसा प्रेमी युगुले नेहमी घेतात. चार वर्षांपूर्वी पोलिसांनी याच ठिकाणी एका युगुलाला पकडले होते.

देवकल फाट्याजवळ तसेच अनावळे गावाच्या पुढेही अनेक ठिकाणी मोठे पाषाण आणि कपारी असून, रस्त्याजवळ एक-दोन दुचाक्या नेहमी दिसतात. स्थानिक ग्रामस्थ सांस्कृतिक प्रदूषणाला त्रासले आहेत.

Web Title: Do not be afraid of Maia Priya ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.