अत्याचार करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:44+5:302021-09-27T04:42:44+5:30
वडूज : ‘गुन्हेगारीतून पैसा मिळवून प्रतिष्ठा घेणाऱ्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ...
वडूज : ‘गुन्हेगारीतून पैसा मिळवून प्रतिष्ठा घेणाऱ्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर स्मार्ट पोलिसिंग योजना राबवावी. नियमित कामात सकारात्मक बदल घडवून आणावेत. पोलिसांना पायाभूत सुविधेसाठी वाढीव निधी मंजूर केला जाईल. समाजात होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंतनीय आहेत. अत्याचार करणारे कितीही मोठे असले, तरी त्याचा मुलाहिजा बाळगू नका,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, दादासाहेब गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नगराध्यक्ष सुनील गोडसे, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, शशिकला देशमुख, जयश्री कदम उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘किशोरवयीन मुलामुलींच्या दैनंदिन वागण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. शक्ती कायदा राबविण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये. पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी मोठा निधी खर्च करूनही इमारतीचे काम दर्जेदार झाले नाही, हे योग्य नाही.’
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘पोलिसांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. ती रक्कम नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतींकडे वर्ग केली. यापैकी ५० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. सद्यस्थितीतील ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीबाबतही राज्य शासन लवकरच निर्णय घेईल.’
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘विकासकामांच्या निधीसंदर्भात राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. येथील नागरिकांनी या नूतन इमारतीकडे लांबूनच पाहावे. इकडे येण्याचा प्रयत्नदेखील करू नये.’
पोलीस उपअधीक्षक नीलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रास्ताविक केले.
फोटो
वडूज पोलीस ठाण्याच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सूचना केल्या. सोबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, प्रभाकर देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)
चौकट
...अन् खासदार, आमदार निघून गेले
इमारतीचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर सभेपूर्वीच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे का निघून गेले? याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, ‘नियमाप्रमाणे पत्रिकेत त्यांचे नाव आहे. उद्घाटन, फोटो सेशनवेळी त्यांना आवर्जून जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तरीही ते निघून गेले. याबाबत त्यांनाच विचारा.
चौकट
एवढ्यात रोलर घेतला असता अजित पवार यांची भाषणशैली सर्वश्रुत आहे. वडूज येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत, सहा हजार स्क्वेअर फूट बांधकामाला तीन कोटी रुपये म्हणजेच पाच हजार रुपये चौरस फूट हा खर्च जादा आहे. पुण्यातदेखील एवढा दर नाही. या परिसरात येताना टेंगळेच लागत होती, त्यामुळे पोलिसांनी ठरवले असते तर रोलर विकत घेतला असता अशी कोपरखळी मारत ‘अशा उद्घाटनाला मला बोलवत जाऊ नका’ असे सांगितले.