गांधी कुटुंबीयांचे योगदान विसरु नका, शरद पवारांनी मोदींना ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:25 PM2019-05-09T14:25:30+5:302019-05-09T14:26:20+5:30
एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली.
सातारा : ‘गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढा मोठा त्याग केल्यानंतर जे हयात नाहीत, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी टीका पवारांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ज्या पदावर ते काम करतात, याची अधिक काळजी घेऊन त्यांनी वक्तव्ये करायला हवीत. बोलताना ते काळजी घेताना दिसत नाहीत. ते रोज गांधीद्वेषाची भाषणे करत आहेत, ते चांगलं लक्षण नाही.’
पंतप्रधानपदावर महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळणार, कोणाला मिळणार? हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाला पोषक स्थिती आता तयार झाली असून त्यासाठी समर्थन देणाºया घटकांना एकत्र करुन एकवाक्यता करावी लागेल. जोपर्यंत ही एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत एखाद्या राज्याला संधी देण्याबाबत चर्चाही करण्यात येणार नाही. आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत.’
दरम्यान, ही एकवाक्यता तुम्हीच घडवून आणू शकता, अशी चर्चा आहे? याबाबत विचारले असता पवारांनी, ‘व्यक्तिगत विचार न करता, एकवाक्यता करुन बहुमत कसं तयार करता येईल, यावर आम्ही भर देऊ,’ असे सांगितले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्राविषयी पत्रकारांनी विचारले असता, ‘राणेंचे आत्मचरित्र हा फार गंभीर विषय आहे. त्यांनी काय लिहिलंय ते वाचल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.
लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आघाडीच्या जागा निश्चित वाढतील, असा विश्वास व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी काँगे्रस आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ४ व काँगे्रसला २ जागा मिळाल्या होत्या. त्यात आता फार सुधारणा होईल. हे मी ज्योतिष सांगत नाही, तर हे मला सरळसरळ दिसतेय. महाराष्ट्रातलाही आकडा मोठा असेल. काही ठिकाणी उत्तम मते मिळतील, तर काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्य कमी मिळेल. महाराष्ट्रात आघाडीच्या खासदारांचा आकडा वाढलेलाच पाहायला मिळेल.’