जयाभाव सोडू नका, टिकून रहा : उदयनराजे

By admin | Published: January 20, 2016 11:32 PM2016-01-20T23:32:46+5:302016-01-21T00:26:56+5:30

मध्यरात्रीच्या अंधारात गोरेंसोबत चर्चा : पाठीवर थाप मारत फेकला डायलॉग, ‘चांगलं केलंस’

Do not give up, stay alive: Udayan Raje | जयाभाव सोडू नका, टिकून रहा : उदयनराजे

जयाभाव सोडू नका, टिकून रहा : उदयनराजे

Next

सातारा : गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या जिल्हा बँक उपोषण प्रकरणात एक वेगळाच नाट्यमय प्रसंग घडला. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले आकस्मातपणे जिल्हा बँकेसमोरील उपोषण मंचकावर आले. गोरे यांच्या पाठीवर थाप मारत ‘जयाऽऽ चांगलं केलंस. सोडू नकोस. टिकून रहा!’ असा कानमंत्र देऊन उदयनराजे निघून गेले.
जिल्हा बँकेतील गैरकारभाराबाबत कारवाई व्हावी, या मागणीसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस. बुधवारी दिवसभर अनेक बडी मंडळी गोरे यांना भेटायला येणार, याची चर्चा करत मंगळवारी मध्यरात्री उपोषणाच्या स्टेजवर कार्यकर्ते निवांतपणे पहुडले होते. रात्री दीडच्या सुमारास अचानक स्टेजजवळ कचकन् गाडी थांबल्याचा आवाज येताच अनेकजण खडबडून जागे झाले. डोळे उघडून पाहतात तर काय, समोर चक्क खासदार उदयनराजे.
नेहमीप्रमाणे ‘कॉलर टाईट’ करत उदयनराजे स्टेजकडे निघाले. पायऱ्या चढण्यापूर्वी त्यांनी गोरे यांच्याकडे पहात ‘अगोदर कोणता पाय टाकू?’ असा सवाल केला. दिलखुलासपणे हसत जयकुमारांनी त्यांच्या संवादाला दाद दिली. स्टेजवर चढत उदयनराजे गोरेंशेजारीच बसले. त्यानंतर सुरू झाला दोघांच्या संवादाची जुगलबंदी. ‘जयाऽऽ चांगलं केलंस. आता त्यांना सोडू नकोस. टिकून रहा!’ असं ठणकावून सांगतानाच उदयनराजेंनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भूमिकेलाही दाद दिली. रणजितसिंहांच्या गालाला कौतुकाने हात लावला. त्यानंतर पुन्हा एकदा बँकेच्या दिशेने चुटकी वाजवत जवळपास दीड तासानंतर ते निघून गेले. (प्रतिनिधी)


माण-खटावच्या कार्यकर्त्यांचा भलताच राबता
जिल्हा बँकेच्या विरोधात आमदार जयकुमार गोरे यांनी उपोषण सुरू केले असून, माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांवरच येथील शक्तिप्रदर्शन दिसून येत आहे. या दोन तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दररोज वाहनाने साताऱ्यात येऊन परत जात आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत. असे असले तरी माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमुळेच उपोषणस्थळी गर्दी दिसून येत आहे. दररोज ठराविक गटातील कार्यकर्ते आंदोलनस्थळी आणण्याची जबाबदारीही काही पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. काही कार्यकर्ते मुक्कामी असतात. त्यांच्यासाठी उपोषणस्थळावर गाद्यांची व पांघरण्याचीही सोय केली आहे.


सदाभाऊ खोत
जिल्हा बँकेवर शासनाने प्रशासक नेमावा
गांजा ओढणाऱ्यांसारखी संचालकांची अवस्था
नाबार्डचे कर्ज संचालक वाटून
घेतात
संचालक लायसन्सधारक दरोडेखोर


खासदार राजू शेट्टी
गैरकारभारामुळे मराठवाडा-विदर्भातल्या ८ बँका बुडाल्या
शेतकऱ्यांच्या भागभांडवलावर जिल्हा बँक तरलीय
जिल्हा बँक संचालकांची नव्हे, शेतकऱ्यांची बँक
घोटाळे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा

कोण काय म्हणाले?राधाकृष्ण विख-पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा
गोरे यांच्या पाठिशी उभं राहणं हे माझं कर्तव्य
संघर्ष होऊ द्यायचा नसेल, तर मार्ग काढा
जिल्हा बँकेबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार
कर्ज प्रकरणे संचालक बैठकीतच मंजूर झाली पाहिजेत

प्रकृती खालावली
उपोषणामुळे अन्न वर्ज केल्याने जयकुमार गोरे यांची प्रकृती बुधवारी खालावली. अ‍ॅसिडिटी वाढली आहे. त्यातच किडनी स्टोन वाढल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, गोरे यांचे वजनही घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
संचालकांची बैठक
बुधवारी दिवसभर काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेनासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी गोरेंच्या उपोषणस्थळाला भेटी दिल्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांची अर्थात बँकेतील सत्ताधारी संचालकांची बैठक समोरच्याच इमारतीत सुरू होती.
शेतकऱ्यांचा ओघ कायम
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा आंदोलनस्थळी येण्याचा ओघ कायम होता. गजीनृत्य करणारे शेतकरीही आंदोलनस्थळी दिसून आले.
बँकेचे एटीएम बंद
ज्या ठिकाणी जयकुमार गोरेंनी उपोषण सुरू केले आहे, त्या स्टेजच्या समोरच जिल्हा बँकेचे एटीएम केंद्र आहे. मात्र, सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहून हे एटीएम बंद ठेवण्यात आले आहे. पैसे काढायला येणारेही स्टेजकडेच बघत परत जाऊ लागले आहेत.
सोनिया गोरे गहिवरल्या
जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे उपोषणस्थळी जवळपास दोन तास बसून होत्या. पतीचा हात हातात घेऊन त्यांना त्या धीर देत होत्या. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांशी बोलत असताना गहिवरल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

Web Title: Do not give up, stay alive: Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.