आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:51 PM2018-07-25T23:51:13+5:302018-07-25T23:53:09+5:30

‘मराठ्यांनो... सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायचं? आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले.

Do not go back without getting reservation .. Shivendra Singh Bhosale | आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले

आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले

googlenewsNext
ठळक मुद्दे काकासाहेब शिंदेंचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

सातारा : ‘मराठ्यांनो... सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायचं? आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, राष्ट्रवादी युवकचे तेजस शिंदे, भाजपचे अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, भीमराव पाटील, किरण बर्गे, नरेंद्र पाटील, जयवंत भोसले, अमोल मोहिते, अविनाश कदम, शरद काटकर, हरीष पाटणे, जयेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज राज्यभर रस्त्यावर आक्रमकपणे उतरलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, हे भाजप सरकारने लक्षात घ्यावे. मराठा आंदोलनाला वेगळे स्वरूप येण्याआधी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाने आत्तापर्यंत शांततेच्या मार्गांनी राज्यभर आंदोलने केली. तरी या भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करीत नाही,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आंदोलनावेळी काकासाहेब शिंदे यांनी दिलेले बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत असून, आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. या सरकारला सळो की पळो करून सोडण्यात येईल.

यापुढील मोर्चे शांततेने नाहीत...
या आंदोलनात सहभागी झालेल्या युवतींनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, मराठा समाज आरक्षण व विविध मागण्यांवर आतापर्यंत राज्यात ५८ मोर्चे निघाले. हे सर्व मोर्चे व आंदोलनेही शांततेच्या मार्गानेच होती. त्यानंतर शासनाने कोणतेही आश्वासन पाळले नाही. सरकारने नोकरी, शिष्यवृत्तीत कोणताही निर्णय घेतला नाही. आतापर्यंत मराठा समाज हा शांत राहिला आहे; पण यापुढे संतप्त भावना व्यक्त करण्यासही हा समाज मागेपुढे पाहणार नाही. येत्या निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. त्यावेळी मते मागायला येताना १०० वेळा विचार करावा. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. येथून पुढे संतप्त भावनेने आंदोलने होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलकांकडून व्यत्यय
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलण्यास ऊभे राहिल्यानंतर काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे नेमके काय बोलतायत, हे कोणालाही समजत नव्हते. युवकांची आरडाओरड सुरूच होती. अखेर अशा गोंधळातच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी आपले भाषण केले.
पोलिसांकडून मोर्चाचे चित्रीकरण
राजवाड्याहून मोर्चास प्रारंभ झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचेपर्यंत पोलिसांनी चित्रीकरण सुरू केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. काहीजण ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

टांगा घेऊन आंदोलनात सहभाग
वर्ये, ता. सातारा येथील चंदुशेठ ननावरे यांनी मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी चक्क टांगा घेऊन हजेरी लावली. सुमारे सहा किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी केला. टांग्याला भगवा झेंडा लावून ते सकाळी घरातून बाहेर पडले. त्यानंतर ठिकठिकाणी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत गणेश ननावरे, अमर ननावरे, नीलेश पठारे, तुषार पठारे, अजय पठारे हेही होते. साताऱ्याच्या रस्त्यावर घोड्याची वाजणारी पावलं प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर त्यांनी ‘दादा’ या त्यांच्या घोड्याला खायला घातले. तिथे उपस्थित असणाºया अनेकांनी घोडा आणि टांगा यांच्याबरोबर सेल्फी काढले.

आमदारांकडून ‘एक मराठा.. लाख मराठा’च्या घोषणा
साताºयात बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आ. शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे व शशिकांत शिंदे यांनी ‘एक मराठा.. लाख मराठा’, ‘जय भवानी.. जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

साताºयातील ऐतिहासिक गांधी मैदानावर मराठा बांधवांची सकाळी नऊ वाजल्यापासून गर्दी जमू लागली. तासाभरात हजारो समाजबांधव या ठिकाणी एकत्र आले. मोर्चा मार्गस्थ होण्यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, तेजस शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेते मोर्चात सहभागी झाले. मोर्चाला सुरुवात होताच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘जय भवानी.. जय शिवाजी, ‘एक मराठा..लाख मराठा,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या ठिकाणीही आ. जयकुमार गोरे यांच्यासह तिन्ही आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य शासनावर सडकून टीका केली.

Web Title: Do not go back without getting reservation .. Shivendra Singh Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.