मुलांनो शहराचं अनुकरण करू नका: अनिल अवचट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:00 AM2019-01-20T04:00:45+5:302019-01-20T04:01:10+5:30
गावच्या मातीनं अजूनही परस्परांना घट्ट धरून राहण्याचे संस्कार जपले आहेत.
सातारा : ‘गावच्या मातीनं अजूनही परस्परांना घट्ट धरून राहण्याचे संस्कार जपले आहेत. इथं फार आधुनिकता नसली तरी माणसाला माणसाशी जोडून राहण्याची शिकवण खोलवर रुजली आहे. त्यामुळे मुलांनो शहराचं अनुकरण करू नका, आपल्या मातीशी नाळ घट्ट ठेवून मग उद्याची स्वप्न साकारा,’ असा सल्ला ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी शनिवारी बालमित्रांना दिला. पुस्तकांचे गाव भिलार येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, मावळते अध्यक्ष ल. म. कडू, रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तके आणि सिडीचे प्रकाशन झाले.
रोपाला पाणी घालून उद्घाटन
वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी घालून २८व्या अखिल भारतीय मराठी बाल कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी पर्यावरण रक्षणासह वाचन चळवळ टिकवून ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.