मैत्रिपर्वाचं कळेना... अन् आघाडीचंही जुळेना!

By admin | Published: January 24, 2017 12:49 AM2017-01-24T00:49:10+5:302017-01-24T00:49:10+5:30

कऱ्हाड तालुक्यातील स्थिती : इच्छुकांसह कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था संपता संपेना; गट, गणासाठी अनेकांनी लावली फिल्डिंग

Do not know about friendship ... and alliance with alliance! | मैत्रिपर्वाचं कळेना... अन् आघाडीचंही जुळेना!

मैत्रिपर्वाचं कळेना... अन् आघाडीचंही जुळेना!

Next



प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
फेबु्रवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. गट आणि गणासाठी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. पण तालुक्याच्या राजकारणातील ‘मैत्रिपर्वा’चं काही कळेना अन् काँगे्रस, राष्ट्रवादी ‘आघाडी’चं जुळता जुळेना, इच्छुकांसह कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था संपता संपेना,’ अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
गत विधानसभा निवडणूक निकालानंतर कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात एका मैत्रिपर्वाचा नव्याने ‘उदय’ झाला. त्यानंतर झालेल्या सहकारी संस्थांच्या दोन निवडणुकीत या मैत्रिपर्वाला ‘अतुल’नीय यश मिळाले. कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीतही हे मैत्रिपर्व जपण्याचा प्रयत्न झाला खरा; पण नगराध्यक्षपदाचे ‘कमळ’ फुलविणाऱ्या रेठरेकरांच्या अंगावरच याचा ‘गुलाल’ पडला. उंडाळकरांचा ‘रोडरोलर’ कऱ्हाडात फिरू शकलाच नाही.
कऱ्हाडात भाजपचा नगराध्यक्ष झाल्याने रेठरेकर ‘डॉक्टरांची’ छाती बत्तीस इंचाने फुगली. त्यानंतर भाजपमधील एका ज्येष्ठ ‘दादा’ मंत्र्यांनी तर येत्या दोन महिन्यांत रेठरेकरांना रेठरेकरांचीच ‘सात बैल जोड्या असलेल्या गाडीतून’
भव्य मिरवणूक काढण्याची संधी
देणार असल्याचे सांगत ‘डॉक्टर बाबांना’ चांगली जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात ‘कमळ’ फुलविण्याचा निर्धारच या डॉक्टरांनी केला असून, वारुंजीच्या जाहीर मेळाव्यात ‘तालुक्यात कमळ चिन्हाशी तडजोड नाही’ अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे ‘जनाधारा’च्या रेट्यावर आजवर ‘रयत’ संघटना भक्कम करणाऱ्या उंडाळे खोऱ्यात काहीशी ‘अस्वस्थता’ पसरली आहे. ‘कोयने’चे पेढे अन् ‘जयवंत
शुगर’ची साखर परस्परांना भरवित दोन युवा नेत्यांनी मैत्रिपर्वाचं बांधलेलं ‘तोरण’, सध्याचं दोघांचं पाहता ‘धोरण’ थोडसं ‘ढिलं’ झाल्याची चर्चा दस्तुरखुद्द दोघांच्या कार्यकर्त्यांच्यात सुरू आहे.
मैत्रिपर्वाचं गणित डोळ्यासमोर ठेवून सर्व गट अन् गणात इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे खरी; पण ‘कमळ’ फुलवायचं की ‘रयत-सहकार’ आघाडीचं ‘बाशिंग’ बांधायचं हे कार्यकर्त्यांनाच कळेनासं झालंय. मात्र, डॉक्टर अन् वकील युवा नेते यावर काहीच भाष्य करताना दिसेनात, एवढं खरं !
दुसरीकडे राज्यात काँगे्रस राष्ट्रवादीची आघाडी होणार का? हा जसा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय. तसाच सातारा जिल्ह्यातही काँगे्रस राष्ट्रवादीची आघाडी होणार का? हा प्रश्नही कार्यकर्त्यांना सतावतोय. कऱ्हाड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिणचे काँगे्रसचे आमदार आहेत. तर
कऱ्हाड उत्तरेत राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे दोन्ही आमदार आपापला मतदारसंघ सक्षम करण्याचा प्रयत्न करण साहजिकच आहे. उत्तरेत काँगे्रस मजबूत करण्यासाठी पृथ्वीबाबांचा ‘हात’भार नेहमीच लागत असतो. दोन दिवसांपूर्वी मसूर येथे झालेला काँगे्रसचा भव्य मेळावा त्याचाच तर भाग आहे.
तर कऱ्हाड शहराचा दक्षिणेत समावेश झाल्याने राष्ट्रवादीच्या मजबुतीला मदत झाली असतानाच रेठरेकर ‘दादा’ अन् उंडाळकर ‘भाऊंच्या’ राष्ट्रवादी प्रवेशाने घड्याळाच्या काट्यांना येथे बळ मिळाले, हे निश्चित. त्यामुळे राष्ट्रवादीनं इथंही स्वबळाचा नारा दिला तर चुकीचं वाटायला नको; पण गत आठवड्यात काले येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची समविचारी पक्षांबरोबर जाण्याची इच्छा असेल तर सकारात्मक विचार करू, असे
संकेत दिल्याने आघाडीच्या
चर्चेला सुरुवात झाली खरी; पण आघाडीच्या चर्चेची गाडी पुढे सरकल्याचे दिसत नाही. चर्चेला सुरुवात कुणी करायची, यावरच घोडं अडल्याचं बोललं जात असून, सध्या सुरू असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चर्चा म्हणजे नुसतं एरंडाचं गुऱ्हाळच म्हणावं लागेल.

Web Title: Do not know about friendship ... and alliance with alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.