विरोधकांना सूचकही मिळू देऊ नका !
By admin | Published: March 30, 2015 09:51 PM2015-03-30T21:51:03+5:302015-03-31T00:24:22+5:30
जिल्हा बँक निवडणूक : ल्हासुर्णेतील बैठकीत शशिकांत शिंदे कडाडले
कुडाळ : विधानसभा कोरेगाव मतदारसंघातून लढविली तरी जावळीच्या जनतेशी अजून नाळ तोडली नसल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक आमदार शशिकांत शिंदे जावळीतून सोसायटी मतदार संघातून लढविणार. भाजपच्या दीपक पवारांनी दंड थोपटल्याने शशिकांत शिंदे सावध झाले असून, रविवारी त्यांनी जावळीतील सोसायटी ठराव झालेल्या मतदारांची ल्हासुर्णे निवासस्थानात बैठक घेतली.
सोसायटी मतदारसंघातून जावळीतून आतापर्यंत दिवंगत लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्यानंतर सुनेत्रा शिंदेंनी परंपरा जपली होती. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिंदे यांनी राजकीय कौशल्याने सुनेत्रा शिंदे यांना या गटातून बाजूला सारत स्वत: बिनविरोध बँकेत जाऊन गटावर कब्जा मिळविला. यावेळीही त्यांनी ठराव प्रक्रियेत अधिक लक्ष घालून आपल्या विचारांचे ठराव करून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केलीे.
तालुक्यात एकूण ४९ सोसायट्या आहेत. ठराव झालेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेत भाजपच्या दीपक पवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांनी रविवारी सायंकाळी मतदारांची बैठक घेतली. या बैठकीस जवळपास ३० ते ३५ मतदार उपस्थित होते, तर उपस्थितांमधून सर्वांनी आमदार शिंदे यांनाच जिल्हा बँकेत बिनविरोध पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देत त्यांना सूचक-अनुमोदकही मिळणार नसल्याचे सांगिंतले.
यावेळी सुहास गिरी, सुदामराव शिंदे, चंद्रकांत तरडे, मोहन कासुर्डे, बबनराव चव्हाण, तानाजी शिर्के, लालासाहेब चव्हाण, राजेंद्र शिंदे, रामदास पार्टे, जयवंत दुदुस्कर, संजय निकम, उपस्थित होते. (वार्ताहर)
शशिकांत शिंदे बिनविरोधचा निर्णय
मतदारांच्या ल्हासुर्णेत झालेल्या या बैठकीत सोसायटी ठराव झालेल्या मतदारांनी आमदार शशिकांत शिंदे यांनाच जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनविरोध पाठवण्याचा निर्णय घेतला तर विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरीदेखील त्यांना उमेदवारी अर्ज भरताना सूचक-अनुमोदक देखील मिळणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही सभापती सुहास गिरी तसेच सुदामराव शिंदे यांनी बैठकीत दिली.