तारळी प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नका
By Admin | Published: October 19, 2015 10:55 PM2015-10-19T22:55:52+5:302015-10-19T23:42:35+5:30
शिवेंद्रसिंंहराजेंनी ठणकावले : सातारा तालुक्यातील लोकांचे तातडीने पुनर्वसन करा
सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील लोकांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, तातडीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू; मगच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडचा सर्व्हे करू, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिले. तारळी प्रकल्पासाठी ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय असवले यांच्या दालनात तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला असवले यांच्यासह तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मोरेवाडीचे सरपंच बजरंग मोरे, ठोसेघरचे माजी सरपंच सीताराम गायकवाड, वरची पवारवाडीचे माजी सरपंच हणमंत पवार, शंकर गायकवाड, जोतिराम गायकवाड, संतोष गायकवाड, किसन पवार, लक्ष्मण गायकवाड, सर्जेराव पवार, नामदेव दळवी, किसन बेडेकर, किसन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तारळी प्रकल्पग्रस्तांनी तक्रारींचा पाढा वाचला. पवारवाडी (वरची) येथील प्रकल्पग्रस्तांना मायणी येथे भूखंड दिले असून, या भूखंडांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे तर, उर्वरित भूखंड प्रकल्पग्रस्तांना देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. या भूखंडांवरील अतिक्रमण हटवून तातडीने भूखंड ताब्यात मिळावेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. तसेच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशीही मागणी केली. वरची पवारवाडी-खालची पवारवाडी रस्त्याचे काम पुनर्वसनाच्या निधीतून करावे. ठोसेघर येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सूर्याचीवाडी, ता. खटाव करण्यात यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. (प्रतिनिधी)
आमदारांची सक्त ताकीद...प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘या प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता रिंगरोडचे काम केले जात आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा. ज्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन निश्चित केले आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करा,’ अशी सक्त ताकीद आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार येत्या आठवडाभरात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकारी असवले यांनी बैठकीत दिले.