टपरीत पान नव्हे.. मिळतेय चक्क दारू : राजवाड्यावरील भरवस्तीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:10 PM2018-12-03T23:10:52+5:302018-12-03T23:11:15+5:30
सातारा : सातारकर साखरझोपेत असतानाच राजवाड्यावरील भरवस्तीत असणाऱ्या एका पानटपरीमध्ये चक्क दारूची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर ...
सातारा : सातारकर साखरझोपेत असतानाच राजवाड्यावरील भरवस्तीत असणाऱ्या एका पानटपरीमध्ये चक्क दारूची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सकाळी साडेआठनंतर टपरीमध्ये इतर साहित्य विकले जात आहे. मात्र, तरीही याची पोलिसांना कशी भणक लागली नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजवाडा हा साताºयाचा ऐतिहासिक ठेवा आहे. या परिसराचे पावित्र्य राखणे हे समस्त सातारकरांबरोबरच पोलिसांचेही कर्तव्य आहे. असे असताना अवैध व्यवसायांमुळे ऐतिहासिक परिसराला गालबोट लागण्यासारखे प्रकार अलीकडे सातत्याने घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच राजवाडा परिसरात असणाºया एका पानटपरीमध्ये पोलिसांना दोन जिवंत काडतुसे सापडली होती. त्यामुळे पानटपरीमध्ये अवैध व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रोवत असल्याचे यातून आता समोर येऊ लागले आहे.
राजवाडा परसिरात गेल्या काही महिन्यांपासून एका व्यक्तीने पानटपरी सुरू केली आहे. ही पानटपरी सकाळी साडेसहा वाजता उघडली जाते. सकाळी या पानटपरीवर लोकांच्या रांगा लागत असल्याचे काही जागृत नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पानटपरीमध्ये थोडे डोकावून पाहिले असता चक्क त्या रांगा दारू पिण्यासाठी लागत असल्याचे निदर्शनास आले. हे पाहून अनेकांना धक्काच बसला. एवढ्या भल्या पहाटे लोक दारू पिण्यासाठी पानटपरीवर गर्दी करत असल्याची माहिती पोलिसांना कशी नाही, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.
संबंधित पानटपरीवर बाहेर कुरकुरे, बडीशेपच्या पुड्या लटकवलेल्या निदर्शनास येतात; परंतु आतमध्ये दारूने भरलेले कॅन ठेवले गेले असल्याचे काही नागरिकांनी पाहिले आहे. पहाटे साडेसहा ते सकाळी साडेआठपर्यंतच या ठिकाणी दारूची विक्री केली जात आहे. इतर शेजारील लोकांनी आपापली दुकाने उघडल्यानंतर या पानटपरीतील दारू विक्री बंद करण्यात येते. त्यानंतर मात्र, पानटपरीसमोर पाहायला मिळतात ते केवळ पिचकारी मारणारे लोक.
ड्राय डेला हाऊसफुल्ल..
शासनाकडून ज्या दिवशी ड्राय डे जाहीर केला जातो, त्या दिवशीही पानटपरी म्हणे हाऊसफुल्ल असते. शहराच्या उपनगरातूनही लोक या ठिकाणी येत असतात. मात्र, या टपरीवर पोलिसांकडून कारवाई कशी होत नाही, हेच न उलगडणारं कोडं आहे. पानटपरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध
धंद्यांचा पोलिसांनी बिमोड करावा, अशी मागणीही यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.